
देहली – येथील भारत मंडपम् येथे ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. या पुस्तक मेळ्यात रशिया, फ्रान्स, कतार, स्पेन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया आणि कोलंबिया यांच्यासह ५० देशांतील आंतरराष्ट्रीय लेखक अन् वक्ते यांनी सहभाग घेतला.
क्षणचित्रे
१. हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेल्या हिंदु राष्ट्र, लव्ह जिहाद आणि हलाल जिहाद यांच्या विषयावरील ग्रंथांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
२. ‘सनातन धर्माविषयी वाचन करणे आणि समजून घेणे, यांत लोकांची आवड वाढली आहे’, असे लक्षात आले. सनातन संस्था, गीता प्रेस गोरखपूर, आर्य समाज, सुरुची प्रकाशन आणि गायत्री परिवार यांच्या ग्रंथप्रदर्शनांवर जिज्ञासूंंची मोठी गर्दी होती.
३. सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनावर आलेल्या जिज्ञासूंनी संस्थेच्या सत्संगाला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली.
४. काही शाळा आणि गुरुकुल यांचे मुख्याध्यापक अन् विश्वस्त यांनी सनातनच्या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी त्यांच्या शिक्षकांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी सनातनच्या साधकांना आमंत्रित केले.