अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार
रत्नागिरी – राज्यातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांनी ‘वाढीव वेतन टप्पा अनुदान तात्काळ मिळावे’, या मागणीसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. ‘जोपर्यंत वाढीव वेतन टप्पा मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. उत्तरपत्रिका पुन्हा शिक्षण मंडळाकडे जमा करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या आंदोलनामुळे प्रश्नपत्रिका तपासणीच्या कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१४ ऑक्टोबर २०२४ या दिवशी शासनाने अंशतः अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय निर्गमित केला होता; मात्र ४ महिने उलटूनही यावर कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई केली जात आहे. याविरोधात अंशतः अनुदानित कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात
येत आहे.
या आंदोलनात रत्नागिरीतील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांनी सहभाग घेतल्याने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे प्राचार्यांकडे तसेच पडून आहेत. हे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शिक्षण मंडळाच्या कोकण विभागाच्या कार्यालयात जमा करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.