लंडन (इंग्लंड) – काही दिवसांपूर्वी कुराण जाळून त्याचा निषेध करणारे स्विडन येथील सलवान मोमिका यांची हत्या करण्यात आली होती. त्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी आणि त्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी लंडन शहरात एक व्यक्ती तुर्कीये दूतावासासमोर कुराण जाळत होती. तेव्हा अचानक एक मुसलमान तेथे आला आणि त्याने त्या व्यक्तीवर चाकूने आक्रमण केले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून जगभर प्रसारित झाला आहे.
१. या व्हिडिओत दिसत आहे की, आक्रमण करणारा हा कुराण जाळणार्या व्यक्तीला भूमीवर पाडतो आणि त्याला लाथा मारतो, तसेच चाकूद्वारे आक्रमण करतो. त्यानंतर पोलीस वेळीच त्या माणसाला वाचवतात आणि आरोपीला अटक करतात.
२. ही घटना लंडनमधील नाईट्सब्रिज येथे घडली. येथे तुर्कीयेचा दूतावास आहे.
३. काही दिवसांपूर्वी डॅनिश राजकारणी रासमूस पालूदान यांनीही डेन्मार्कमधील तुर्कीये दूतावासाबाहेर कुराण जाळून सलवान मोमिका यांना श्रद्धांजली वाहिली होती. पालूदान हे डेन्मार्कच्या कट्टर राष्ट्रवादी पक्ष ‘स्ट्रॅम कुर्स’चे संस्थापक आहेत.
४. सलवान मोमिका हे इराकी वंशाचे स्विडनचे नागरिक होते. कुराणामधील शिकवणीला विरोध म्हणून अनेक वेळा त्यांनी जाहीरपणे कुराण जाळले होते. याचाच सूड घेण्यासाठी ३० जानेवारीला त्यांची हत्या करण्यात आली होती.