नालासोपारा (जिल्हा ठाणे) येथील ४० अनधिकृत इमारती पाडल्या !

नालासोपारा – पूर्वेकडील अग्रवाल नगरी येथे कचरा साठवण्याची जागा (डम्पिंग ग्राऊंड) आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसाठी आरक्षित असलेल्या भूमीवर खासगी विकासकाने कोणत्याही अनुमतीविना ४१ अनधिकृत इमारती उभारल्या होत्या. त्यात सहस्रो लोक रहात होते. त्यांपैकी ४० इमारती वसई-विरार महापालिकेने कारवाई करून पूर्णतः भुईसपाट केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी या ईमारती भुईसपाट करण्याचा आदेश दिला होता. सर्वाेच्च न्यायालयात याविषयीची याचिका फेटाळून लावण्यात आली होती.

या कारवाईमुळे आता २ सहस्र ३०० कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. तोडकामाची कारवाई केल्यानंतर त्या रहिवाशांच्या पुनर्वसनाची व्यवहार्यता आणि शक्यता तपासली का ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने वसई-विरार महापालिकेला केली आहे. तसेच त्याविषयी उत्तर देण्यासाठी महापालिकेला ६ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. यापैकी ७ इमारती धोकादायक म्हणून महानगरपालिकेने सांगितल्या होत्या.

संपादकीय भूमिका

अनधिकृत इमारती उभ्या रहातांनाच त्यांच्यावर कारवाई करण्याची यंत्रणा का नाही ?