
‘सनातनचा एक साधक काही वर्षे तळमळीने, झोकून देऊन आणि पुष्कळ समष्टी सेवा करत होता. वर्ष २००६ मध्ये त्याला एका संतांनी गुरुमंत्र दिला. तेव्हापासून ते जानेवारी २०२५ पर्यंत त्या साधकाने समष्टी सेवा करणे बंद केले होते. त्याला वाटले, ‘संतांनी गुरुमंत्र दिला म्हणजे त्यातच सर्व आले. आता केवळ नामजप केला की, झाले. समष्टी सेवा करणे आता आवश्यक नाही.’
साधकाचा हा दृष्टीकोन चुकीचा आहे; कारण ‘नामजप करणे’, ही व्यष्टी साधना झाली. या कलियुगात तिला केवळ ३० टक्के महत्त्व आहे, तर समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे !
संत गुरुमंत्र केव्हा देतात ? जेव्हा त्यांना वाटते, ‘एखादा साधक किंवा शिष्य हा योग्य मार्गाने आध्यात्मिक वाटचाल करत आहे, तसेच योग्य ती समष्टी सेवा तळमळीने करत आहे’, तेव्हाच ते त्याची आध्यात्मिक उन्नती आणखी जलद होण्यासाठी त्याला गुरुमंत्र देतात.
साधकाने नेमके उलट केले. त्याने समष्टी सेवा करणे सोडून दिले. तसेच ‘आपण करत असलेले योग्य आहे का ?’, हे गुरुमंत्र दिलेल्या संतांना विचारले नाही. त्यामुळे त्याची साधनेतील १९ वर्षे वाया गेली. हा दृष्टीकोन साधना करणार्या सर्वांनी लक्षात घ्यायला हवा !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.२.२०२५)