ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांचा संगम करून काम करणे म्हणजे धर्म आचरण ! – डॉ. दिलीप देवधर, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ

 ‘ग्राहक पेठ सांस्कृतिक महोत्सवा’च्या अंतर्गत देवधर यांना पुरस्कार प्रदान !

दिलीप देवधर यांना पुरस्कार प्रदान करतांना सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर

पुणे – कोणतेही कार्य ते धर्माचरण म्हणून करावे. कोरोनाकाळात आपल्या ज्ञानाचा उपयोग आणि रुग्णांना धीर देण्याचे काम मी केले, तो भक्तीयोग होता. ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांचा संगम करून काम करणे म्हणजे धर्म आचरण आहे, असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. दिलीप देवधर यांनी व्यक्त केले. ‘ग्राहक पेठ सांस्कृतिक महोत्सव’ अंतर्गत डॉ. दिलीप देवधर यांना सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्वारगेट येथील ‘गणेश कला क्रीडा मंच’ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, ‘अदानी ग्रुप’चे वरिष्ठ अधिकारी अनिल सिंह, राजेश शहा आदी उपस्थित होते. विजय फळणीकर म्हणाले की, मानसिकता हरवलेले लोक जेव्हा वृद्धाश्रमात येतात, तेव्हा लक्षात येते की, आपली सहनशक्ती किती असावी लागते ? दिलीप देवधर यांच्याकडे पाहून कळते की, कोणत्याही परिस्थितीत संयमाचा तोल ढळू न देता निःस्वार्थीपणे कसे काम करायला हवे !