Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभाच्या काळात ५१ कोटी भाविकांचे संगमावर स्नान !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

शहरात पुन्हा वाहतुकीची कोंडी !

लोकसभा सभापती ओम बिरला पत्नीसह संगमावर स्नान करतांना

प्रयागराज, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – १५ फेब्रुवारी हा महाकुंभाचा ३४ वा दिवस आहे. शनिवार व १६ फेब्रुवारी या दिवशी रविवार असल्यामुळे त्रिवेणी संगमावर भाविकांची अधिक गर्दी झाली आहे. शहरात पुन्हा वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. १३ जानेवारीपासून ते आतापर्यंत एकूण ५१ कोटी ३ लाख भाविकांनी संगमावर स्नान केले आहे. इतिहासातील हा सर्वांत मोठा महोत्सव नोंदवला गेला आहे. ४५ दिवस चालणारा महाकुंभ अजून ११ दिवसांचा आहे.

लोकसभाचे सभापती ओम बिर्ला यांनी पत्नीसह संगमावर स्नान केले, तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी संगमात स्नान केले. या व्यतिरिक्त शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही संगमावर स्नान केले.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल स्नान करतांना

ओम बिरला म्हणाले की, धर्म, अध्यात्मिकता आणि संस्कृती यांचा महाकुंभ दिव्य आहे. महाकुंभात दिव्य ऊर्जा आहे. मी गंगामातेला प्रार्थना करतो की, गंगामातेचा आशीर्वाद सदैव आम्हा सर्वांवर असू द्या. पियुष गोयल म्हणाले की, एक भारत श्रेष्ठ भारताचे अनमोल उदाहरण म्हणजे महाकुंभ आहे. वेद पुराणात महाकुंभाचा उल्लेख आढळतो. हे आयोजन समभाव आणि समरसता यांचे प्रतीक आहे. येथे जाती आणि धर्म असा भेदभाव न करता सर्व लोक एकत्र येऊन श्रद्धेने संगमात स्नान करतात. महाकुंभ हा केवळ आंतरिक ऊर्जा आणि चेतना यांना जागृत करत नाही, तर आत्मा आणि मन यांची शुद्धताही प्रदान करतो. येथील नियोजन विशालता आणि पवित्रता दर्शवते.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मंत्रीमंडळातील मंत्री आणि आमदार येथे संगमावर स्नान करण्यासाठी आले आहेत.

या वेळी प्रमोद सावंत म्हणाले की, उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे महाकुंभाचे मोठे आयोजन केले आहे. येथे आल्यानंतर मला आनंद मिळत आहे.