Sambhal Violence Suspects : संभल हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी जामा मशिदीबाहेर लावली ७४ संशयितांची भित्तीपत्रके !

संशियतांना ओळखणार्‍यांना देणार बक्षीस

संभल (उत्तरप्रदेश) – अज्ञात व्यक्तींनी संभल हिंसाचारप्रकरणी लावण्यात आलेल्या एका आरोपीचे भित्तीपत्रक काढून टाकल्याच्या काही घंट्यांनंतर पोलिसांनी आता हिंसाचारातील सर्वच ७४ संशयितांचे भित्तीपत्रके लावली आहेत. नोव्हेंबर महिन्यात मुसलमानांनी केलेल्या हिंसाचारात २० पोलीस घायाळ झाले होते. आरोपींना ओळखण्यात साहाय्य करणार्‍याला बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे.

या संदर्भात संभलचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीश चंद्र म्हणाले की,

१. भित्तीपत्रकांमध्ये हिंसाचाराच्या दिवशी हातात दगड घेऊन जाणार्‍या संशयितांची छायाचित्रे आहेत. ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही आणि भ्रमणभाषवर बनवलेले व्हिडिओ यांत हिंसाचार करणार्‍यांचे चेहरे समोर आले आहेत. त्यांची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. त्यामुळे यासाठी जनतेकडून साहाय्य मागण्यासाठी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत.

२. संभल जामा मशिदीसह अनेक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत.

३. मशिदीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अलीकडेच उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीवर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर भित्तीपत्रके पुन्हा फाडली जाऊ नयेत, याचे दायित्व सोपवण्यात आले आहे.


काय आहे प्रकरण ?

१९ आणि २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी न्यायालयीन आदेशानुसार संभल येथील जामा मशिदीचे सर्वेक्षण चालू होते. ते रोखण्यासाठी मुसलमानांनी २४ नोव्हेंबरला हिंसाचार केला. त्या वेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सर्वेक्षण शांततेत पार पडावे, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हिंदु पक्षाने केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मशिदीत भगवान कल्की यांना समर्पित मंदिर आहे. वर्ष १९०४ च्या प्राचीन स्मारक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत हे ठिकाण संरक्षित आहे.