|

प्रयागराज – हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, हिंदु राष्ट्राची संकल्पना, धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीने आरंभलेले कार्य यांविषयी महाकुंभमेळ्यातील प्रदर्शन युवकांना आकर्षित करत आहे. शास्त्रीय भाषेत धर्माचे स्वरूप, प्राचीन भारतीय संस्कृती आणि हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घेण्यात युवक-युवती उत्सूक असल्याचे दिसून येत आहे. महाकुंभमेळ्यात सेक्टर ६ मधील कैलासपुरी-भारद्वाज मार्ग चौकात असलेल्या या प्रदर्शनाला आतापर्यंत सहस्रो युवक-युवतींनी भेट देऊन हिंदु जनजागृती समितीचे कार्य समजून घेतले आहे. यांतील अनेकांनी समितीच्या धर्मकार्यात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धताही दर्शवली.
विविध राज्यांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या युवकांनी महाकुंभमेळ्यात आल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. सामाजिक माध्यमांद्वारे प्रदर्शनातील फलकांचा प्रचार करण्यासाठी सर्वच युवकांनी स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये प्रदर्शनातील फलकांची छायाचित्रे काढली. प्रदर्शन पाहून झाल्यावर ‘सेल्फी पॉईंट’वर ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या घोषणा देऊन युवावर्ग स्वत:ची छायाचित्रेही काढत आहेत. प्रदर्शनाला भेट दिलेल्या धर्मप्रेमींनी नोंदवलेल्या अभिप्रायामध्ये ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करावा’, या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.
आपल्या भागात धर्मकार्य चालू करण्याची सिद्धता !
प्रदर्शनामधील ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडन’, या ग्रंथांना युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनामध्ये बांगलादेशातील हिंदूंवर, काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांची वस्तूस्थिती मांडण्यात आली आहे. हिंदु संतांच्या हत्या, लव्ह जिहादची भीषणता यांचे वास्तव पाहून हिंदूंमध्ये जागृती निर्माण होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. हे प्रभावी प्रदर्शन आपल्या भागामध्ये लावण्याची सिद्धता धर्मप्रेमी युवक आणि विविध संघटना यांनी दर्शवली. यासाठी लागणारी सर्व व्यवस्था करण्याची सिद्धताही या युवकांनी दर्शवली. स्वरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, अशा प्रकारे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता युवकांनी दर्शवली.