DMK’s Anti-Hindu Order : तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदुद्वेषी आदेश हिंदु संघटनांच्या विरोधानंतर मागे !

दक्षिणा म्हणून मंदिराच्या पुजार्‍याच्या पूजेच्या ताटात असलेली नाणीही सरकारी तिजोरीत जमा करण्याचा दिला होता आदेश

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील द्रमुक सरकारने एका आदेशात म्हटले होते, ‘मंदिरातील पुजार्‍यांनी त्यांच्या पूजेच्या ताटामध्ये अर्पण करण्यात येणारी नाणी सरकारी तिजोरीत जमा करावीत.’ सरकारी आदेशात, मंदिरातील सुरक्षा कर्मचार्‍यांना पुजार्‍यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आदेशाला हिंदु संघटनांनी विरोध केल्यानंतर सरकारने हा आदेश मागे घेतला आहे.

१. तमिळनाडूच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाने ७ फेब्रुवारी २०२५ या दिवशी वरील आदेश दिला होता. यात म्हटले होते की, पुजार्‍यांना सरकारकडून वेतन दिले जाते; म्हणून मंदिरात मिळणारी प्रत्येक देणगी सरकारी तिजोरीत जमा करावी.

२. या आदेशाच्या संदर्भात हिंदू तमिलर कत्छी (हिंदु तमिळ पक्ष) या संघटनेने निषेध करत म्हटले होते की, ही सूचना हास्यास्पद आणि निषेधार्ह आहे. भक्त सहसा मंदिरातील पुजार्‍यांच्या ताटात १ किंवा ५ चे नाणे अर्पण करतात, हे त्या परिसराच्या आणि स्थानिक परंपरांनुसार अर्पण केले जाते. देवाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाणी अर्पण केली जातात. धर्मदाय विभागाने या छोट्याशा अर्पणावरही लक्ष ठेवणे चुकीचे आहे. या विरोधात न्यायालयीन लढाईही लढण्यात येईल .

३. यानंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या निषेधामुळे, हिंदु धर्मादाय विभागाने ही सूचना मागे घेतली आहे. मंदिराच्या विश्वस्तांशी चर्चा केल्याविनाच हा आदेश देण्यात आल्याचे विभागाने म्हटले आहे.

४. यापूर्वी एप्रिल २०२४ मध्ये मंदिरात आलेले काही पैसे घेतल्याच्या आरोपाखाली तमिळनाडू सरकारने ४ पुजार्‍यांना अटक केली होती. त्यांच्यावर भक्तांनी पुजेच्या ताटात दिलेले पैसे घेतल्याचा आरोप होता.