Whitechapel Station Name : लंडनमधल्या एका रेल्वे स्थानकाच्या बंगाली भाषेमधील पाटीला ब्रिटीश खासदाराचा विरोध

उद्योगपती इलॉन मस्क यांचा खासदाराला पाठिंबा

वर्तुळात ग्रेट यारमाउथचे खासदार रुपर्ट लोवे

वॉशिंग्टन (अमेरिका) – ब्रिटनची राजधानी लंडन येथील एका रेल्वे स्थानकाच्या नावाची पाटी बंगाली भाषेतही लिहिण्यात आली आहे. याविषयी लंडनमधील एका खासदाराने सामाजिक माध्यमातून पोस्ट करत ‘रेल्वे स्थानकाच्या नावाची पाटी केवळ इंग्रजीतच असावी’ असे म्हटले. त्याला अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी समर्थन दिले आहे.

१. लंडनमधील ‘व्हाइटचॅपल’ रेल्वे स्थानकाच्या संदर्भातील हे प्रकरण आहे. ग्रेट यारमाउथचे खासदार रुपर्ट लोवे यांनी बंगाली पाटीवर आक्षेप घेतला आहे. यावर लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी इंग्रजीचे समर्थन केले, तर काहींनी ‘जपान किंवा चीन येथील एखाद्या शहरात गेल्यानंतर प्रवाशांचे काय होईल?’ असा प्रश्न उपस्थित करत २ भाषांमध्ये पाटी असण्याचे समर्थन केले.

२. व्हाइटचॅपल स्थानकावर वर्ष २०२२ मध्ये बंगाली भाषेतील पाटी बसवण्यात आली.   पूर्व लंडनमध्ये बांगलादेशी समुदायाने दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ ही पाटी बसवण्यात आली. टॉवर हॅमलेट्स कौन्सिलने ही पाटी लावण्यासाठी निधी दिला होता. या भागात मोठ्या संख्येने बांगलादेशी समुदाय वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले होते.