Sanatan Prabhat Exclusive : कुंभमेळ्यात ‘इस्कॉन’च्या शिबिरात आग, १३ तंबू जळून खाक !

प्रयागराज, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यात सेक्टर १८ मधील अलोप-शंकराचार्य चौकातील ‘इस्कॉन’च्या शिबिरामध्ये ७ फेब्रुवारी या दिवशी अनुमाने सकाळी १०.३० वाजता भीषण आग लागली. या आगीमध्ये इस्कॉनच्या शिबिरातील १३ तंबू यांसह पलंग, खुर्च्या, वातानुकूलित यंत्रे, प्रसाधनगृहे, देव्हारा, स्वयंपाकघर आदी सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कुणी घायाळ झालेले नाही. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले; मात्र प्रशासनाकडून अद्याप याविषयीचे अधिकृत कारण सांगण्यात आलेले नाही.

इस्कॉनमध्ये जळलेल्या सर्व तंबूंची अक्षरश: राखरांगोळी झाली. तंबूचे कापड, गाद्या आणि वातानुकूलित यंत्रांतील गॅस अन् जोराचा वारा यांमुळे आग काही वेळातच सर्वत्र पसरली. अग्नीशमन दलाचे उपनिर्देशक अमन शर्मा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती देतांना म्हणाले की, इस्कॉनच्या आजूबाजूच्या शिबिरांमधून अग्नीशमन दलाला आगीची माहिती मिळाली. माहिती प्राप्त होताच अग्नीशमन दलाची यंत्रणा थोड्या वेळातच घटनास्थळी पोचली. आग एकदा विझवल्यानंतर थोड्या वेळात ती पुन्हा धुमसायला लागली.

पोलीस आणि भाविक यांच्यामध्ये वादावादी !

इस्कॉनच्या शिबिरातील यंत्रांमुळे आग सर्वत्र पसरली, असा दावा करत बाजूच्या शिबिरातील भाविकांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. ‘साधना करण्यासाठी आलेल्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रांना अनुमती कशी दिली ?’, असा प्रश्‍न उपस्थित करत आजूबाजूच्या शिबिरातील भाविकांनी पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दैवी संपद मंडळाच्या शिबिराचीही मोठी हानी !

इस्कॉनच्या शिबिरामधून आग बाजूच्या दैवी संपद मंडळाच्या शिबिरापर्यंत पोचली. त्यामुळे दैवी संपद मंडळाच्या शिबिरातील गाड्या, शिबिरातील मोठी कापडे यांसहे अन्य साहित्य जळून खाक झाले. इस्कॉनच्या शिबिरात असलेल्या वातानुकूलित यंत्रांमुळे आग भडकली, असे शेजारच्या शिबिरार्थींचे म्हणणे होते.