‘प.पू. भक्तराज महाराज रचित भजने आणि त्यांचे शिष्य प.पू. डॉ. आठवले यांची शंकानिरसन ही ध्वनीफीत’ यांतील शब्दातीत चैतन्याची प्रचीती घेतलेले तमिळ भाषिक श्री. पन्नीर !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. कांचीपूरम् येथे ‘गुरुनिवास’ या वास्तूच्या बांधकामात येणारे अडथळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यामुळे दूर होणे

‘कांचीपूरम् येथे ‘गुरुनिवास’ या वास्तूचे बांधकाम करण्यात बरेच अडथळे येत होते. ते अडथळे दूर होण्यासाठी आम्ही बरेच आध्यात्मिक स्तरावरील उपायही करत होतो. आम्ही ‘वास्तूत विभूती फुंकणे, तसेच वास्तूचे छायाचित्र काढून त्याला प.पू. डॉ. आठवले किंवा प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र लावून ठेवणे, उदबत्तीने वास्तूची शुद्धी करणे, बांधकामाच्या ‘सिमेंट’मध्ये विभूती घालणे’, असे अनेक उपाय केले. त्यानंतर ‘वास्तूचे बांधकाम लवकर आणि निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी आम्ही वास्तूत सतत ध्वनीक्षेपकावर (स्पीकरवर) प.पू. डॉक्टरांची शंकानिरसन ही ध्वनीफीत, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांची भजने २४ घंटे लावून ठेवत होतो.

२. ‘प.पू. भक्तराज महाराज रचित भजने आणि त्यांचे शिष्य प.पू. डॉ. आठवले यांची शंकानिरसन ही ध्वनीफीत’ ऐकून बांधकाम निरीक्षक श्री. पन्नीर यांना आधार वाटणे आणि संतांच्या दैवी वाणीमुळे त्यांना सुरक्षित वाटणे

तेथे कायम रहात असलेले बांधकाम निरीक्षक श्री. पन्नीर हे तमिळ भाषिक आहेत. श्री. पन्नीर यांनी श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे) यांना सांगितले, ‘‘या ध्वनीफितींत काय आहे ?’, हे मला समजत नव्हते. पहिले ३ मास माझे त्याकडे लक्षही नसायचे; पण नंतर मला या ध्वनीफिती ऐकून एक प्रकारचा आधार वाटू लागला आणि माझे मनही शांत होऊ लागले. मला हा आवाज हवाहवासा वाटू लागला आणि ‘या आवाजाच्या सान्निध्यात मी सुरक्षित आहे’, असे मला वाटू लागले.’’

३. श्री. पन्नीर यांनी वास्तूशांतीच्या वेळी उपस्थित असलेले अभियंता आणि वास्तूविशारद यांना या ध्वनीफिती लावल्यामुळे होणार्‍या लाभाचे महत्त्व सांगणे

‘गुरुनिवास’ या वास्तूत वास्तूशांत असतांना तेथे काही बांधकाम अभियंता, तसेच वास्तूविशारद आले होते. त्यांनाही श्री. पन्नीर सांगत होते, ‘‘या ध्वनीफिती तुम्ही करत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणीही लावा. यामुळे तुम्ही करत असलेले बांधकाम लवकर पूर्ण होईल आणि त्यांत काही अडथळेही येणार नाहीत.’’

४. संतांच्या दैवी वाणीतील सामर्थ्य !

यातून लक्षात आले, ‘प.पू. डॉक्टरांची ध्वनीफीत, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांची भजने यांत किती चैतन्य आहे ! या ध्वनीफितींत शब्दांच्या पलीकडील चैतन्य आहे आणि मराठी भाषा न जाणणार्‍या श्री. पन्नीर यांनाही चैतन्याची जाणीव झाली.’ यातूनच ‘संतांची वाणी किती दैवी असते !’, तेही लक्षात येते.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (१३.१२.२०२४)

एका कामगाराने ‘कुणीतरी पैंजण घालून वावरत आहे’, असा आवाज ऐकणे आणि ‘ती श्री कामाक्षीदेवी आहे आणि ती ‘गुरुनिवास’ वास्तू तिची असल्याची प्रचीती देत आहे’, असे वाटणे

‘गुरुनिवास’ येथे काम करणार्‍या विनायक नावाच्या सुताराचा एक साहाय्यक श्री. विनायक शानभाग यांना म्हणाला, ‘‘गेले ३ – ४ दिवस मी याच वास्तूच्या गच्चीवर झोपत आहे. त्या वेळी ‘कुणीतरी पैंजण घालून येथे वावरत आहे’, असा आवाज मी ऐकला.’’ त्या वेळी माझ्या मनात आले, ‘प्रत्यक्ष बालत्रिपुरसुंदरीच येथे वावरत असेल; कारण कांचीपूरम् हा देवीलोक आहे आणि हे तिचेच क्षेत्र आहे.’ शिवाच्या सांगण्यावरून श्री पार्वतीदेवी ८ वर्षांच्या बालिकेच्या रूपात थेट कैलासातून येथे आली होती, म्हणजेच ‘आता देवी ही तिचीच वास्तू असल्याची प्रचीती आम्हाला देत आहे’, असे मला वाटले. ‘हिलाच कांचीची कामाक्षी’, असेही म्हटले जाते. ‘कांचीपूरम् येथे होणारी वास्तू आणि तेथून होणारे समष्टी कार्य यांना श्री कामाक्षीदेवीचेही आशीर्वाद लाभू देत’, अशी तिच्या चरणी प्रार्थना करते.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (१३.१२.२०२४)

 

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक