US On Gaza : आम्ही गाझा पट्टीचे दायित्व घेऊ ! – डॉनल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भेटीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे विधान

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दौर्‍यावर आलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. दोघांनी पत्रकार परिषद घेऊन भेटीत चर्चा झालेल्या विषयांची माहिती दिली. ट्रम्प म्हणाले की, आम्ही गाझा पट्टीचे पूर्ण दायित्व घेऊ. तेथील सगळे जिवंत बाँब आणि शस्त्रास्त्रे आम्ही निष्प्रभ करू. तिथल्या पडक्या इमारती पूर्ण पाडून तिथे नवीन आर्थिक विकासाची पायाभरणी करायला हवी. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. आपण काहीतरी वेगळे काम करायला हवे.

१. या वेळी ट्रम्प यांनी अमेरिकेचे सैन्यदल गाझा पट्टीत तैनात करण्याचीही सिद्धता असल्याचे सांगितले. अमेरिकेने गाझा पट्टीवर अंमल प्रस्थापित करणे, ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असेल आणि त्यात अमेरिका या भागाचे पूर्ण दायित्व घेईल. यातून गाझा पट्टीत आणि पर्यायाने मध्य-पूर्व आशियात मोठ्या प्रमाणावर स्थैर्य निर्माण होईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

२. ट्रम्प यांच्या या विधानाला इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी संमती दिली. ते म्हणाले की, आमच्या विरोधातील अनेक आक्रमणे, अनेक कारवाया, आतंकवादी कृत्ये या गोष्टींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जो भाग कायम चर्चेच्या अन् घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिला, त्या भागाच्या भवितव्याकडे डॉनल्ड ट्रम्प वेगळ्या दृष्टीने पहात आहेत.