Hamas In POK : पाकव्याप्त कश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कार्यक्रमात ‘हमास’चे आतंकवादी सहभागी होणार !

नवी देहली – पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटना जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तोयबा पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमाला गाझा पट्टीतील जिहादी आतंकवादी संघटना हमासचे आतंकवादीही उपस्थित रहाणार आहेत. हा कार्यक्रम रावलकोट येथे होणार आहे. याठिकाणी हमासच्या आतंकवादी नेत्यांची भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. साबिर शहीद स्टेडियममध्ये ‘कश्मीर सॉलिडेरिटी अँन्ड अल अक्सा फ्लड कॉन्फरन्स’ या नावाने हा कार्यक्रम असणार आहे. कार्यक्रमाला हमासचा प्रवक्ता खालिद कद्दूमी याचे भाषणही होणार आहे.

१. भारत सरकारने आजतागायत हमासला आतंकवादी संघटना मानलेले नाही. भारत सातत्याने पॅलेस्टाईनचे समर्थन करत आला आहे. हमासला एक आतंकवादी संघटना मानावे, यासाठी इस्रायलने वेळोवेळी भारताकडे मागणी केली आहे. वर्ष २०२३ मध्ये इस्रायलने वर्ष २००८ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणावरून लष्कर-ए-तोयबाला आतंकवादी संघटना घोषित केले होते.

२. मागील वर्षी ऑगस्टमध्ये हमास आणि लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी सैफुल्ला खालिद यांच्यात बैठक झाली होती. कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या या बैठकीनंतर भारत सतर्क झाला होता. सैफुल्ला खालिद याला वर्ष २०१८ मध्ये अमेरिकेने आतंकवादी घोषित केले आहे. तो तोयबाचा संस्थापक हाफीज सईद याचा निकटवर्तीय मानला जातो.

३. गुप्तचर यंत्रणेनुसार पाकिस्तान यामाध्यमातून जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा लावून धरण्याचा प्रयत्न करणार आहे. पॅलेस्टाईन आणि काश्मीर एकसारखेच सूत्र आहे. दोन्ही ठिकाणी मुसलमानांचा कथित छळ केला जात आहे. ही दोन्ही ठिकाणे एकसारखीच असल्याचे दाखवून तो इस्लामी देशांना एकत्र येण्याचे आवाहन करू शकतो.

संपादकीय भूमिका

पॅलेस्टाईनला पाठिंबा देणार्‍या भारताला हमासकडून मिळणारी ही भेट समजायची का ? भारताने आता हमासला आतंकवादी संघटना घोषित करून पॅलेस्टाईनचे समर्थन करण्याविषयी पुनर्विचार करणे आवश्यक आहे !