स्‍वभाषाभिमान जोपासा आणि सात्त्विक मराठी भाषेतील चैतन्‍य ग्रहण करा !

‘माझिया मराठीचे नगरी’

अक्षय्‍य तृतीयेच्‍या मुहूर्तावर मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध)’ भाषेचा दर्जा मिळाला. या पार्श्‍वभूमीवर शासनाच्‍या स्‍तरावर शासकीय संस्‍थांकडून आतापर्यंत मराठी भाषेच्‍या संवर्धनासाठी झालेल्‍या प्रयत्नांचा आपण परिचय करून घेतला. त्‍यानंतर विविध स्‍तरांवरील मराठी भाषेची सध्‍याची दूरवस्‍था समजून घेण्‍याचा प्रयत्न केला. मराठी भाषेची ही सद्यःस्‍थिती दूर करण्‍यासाठी शासनासह प्रत्‍येक मराठी माणसाने मनापासून मराठीचा स्‍वाभिमान जोपासणे आणि तिचा अधिकाधिक वापर करणे अत्‍यावश्‍यक आहे. हे करणे का आवश्‍यक आहे आणि त्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजना या लेखात पाहू.   

१. भारतीय भाषांविषयी तुच्‍छभावना निर्माण होणे, ही नेहरूंची देण !

आईलाही इंग्रजीतून पत्रे लिहिणार्‍या आंग्‍लप्रेमी नेहरूंमुळे भारतीय भाषांना तुच्‍छ लेखण्‍याची कुपरंपरा आणि विकृती देशात फोफावण्‍यास चालना मिळाली. देशाचा पहिला पंतप्रधान जर राष्‍ट्रप्रेमी असता, तर भारतीय भाषांची एवढी दूरवस्‍था झाली नसती.

सौ. रूपाली वर्तक

राज्‍यघटनेचे हिंदीत भाषांतर केले म्‍हणून नेहरूंनी टीका केली होती. आज ‘राज्‍यघटने’वरून जे नेते राजकारण करत आहेत, त्‍यांच्‍या पूर्वजांना ती राज्‍यघटना ‘सामान्‍यांना कळण्‍यासाठी ती भारतीय भाषांत हवी’, असे वाटत नव्‍हते, हा विरोधाभास लक्षात घ्‍या ! नेहरू केवळ इंग्रजी भाषाप्रेमी नव्‍हते, तर ते आंग्‍लसंस्‍कृतीप्रेमी होते. त्‍या आंग्‍लप्रेमाने त्‍यांच्‍यात भारतीय संस्‍कृती आणि भारतीय भाषा यांच्‍याविषयी द्वेष निर्माण केला होता.

२. ‘इंग्रजी बोलणे म्‍हणजे प्रतिष्‍ठा’, हा समज दूर झाला पाहिजे !

जगातील केवळ १२ देशांत इंग्रजी बोलली जाते आणि जपान, जर्मनी, चीन, रशिया आदी अनेक प्रगत देशांत त्‍यांचीच भाषा बोलली जाते, हे लक्षात घेतले पाहिजे. अनेक विकसित देशांचे नेते आंतरराष्‍ट्रीय परिषदांत स्‍वभाषेत बोलण्‍यास प्राधान्‍य देऊन समवेत दुभाषिकाचे साहाय्‍य घेतात.

इंग्रजी बोलण्‍याला असलेली तथाकथित प्रतिष्‍ठा ही पाताळयंत्री इंग्रजांनी भारताची राष्‍ट्र, धर्म, संस्‍कृती, भाषा आदींविषयीची अस्‍मिता पुसण्‍यासाठी दिलेली ‘भेट’ होती. आपण ती स्‍वीकारली आणि त्‍याचे अनुकरण केले. आज ७७ वर्षांनंतर त्‍यामुळे झालेली हानी पहाता परत स्‍वभाषेचे पुनरुज्‍जीवन करण्‍याची वेळ आली आहे.

मानवी जीवनाचा उद्धार करणारे खरे ज्ञान मराठीत (किंवा भारतीय भाषांमध्‍ये) उपलब्‍ध असल्‍याने मराठी ही खरी ‘ज्ञानभाषा’ आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञान यांची भाषा इंग्रजी असल्‍यामुळे तिला मिळालेली प्रतिष्‍ठा ते ज्ञान मराठीतही उपलब्‍ध झाले, तर एका क्षणात न्‍यून होईल; कारण बुद्धी किंवा हुशारी ही भाषेवर अवलंबून नाही, तर तिचे घटक स्‍वभाषेतील उच्‍चतम संस्‍कृतीशीच निगडित आहेत. बुद्धीमान व्‍यक्‍ती ज्ञानाला महत्त्व देतात. स्‍वभाषेतील ज्ञानाने इंग्रजी भाषेच्‍या दिखाव्‍याचा फुगा फोडला गेला, तर त्‍यात प्रतिष्‍ठेचा भाग काहीच रहात नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

३. संस्‍कृतीरक्षणासाठी स्‍वभाषेचा कट्टर पुरस्‍कार आवश्‍यक !

ज्‍या सुखी जीवनाच्‍या उद्देशाने मुलांना इंग्रजी माध्‍यमामध्‍ये घातले गेले किंवा जातेे, त्‍याचे काही दुष्‍परिणाम हे केवळ भाषाच नव्‍हे, तर अनुषंगाने अपरिहार्यरित्‍या ओळखीची होणारी इंग्रजी संस्‍कृती अंगिकारण्‍यात झाले आहेत. इंग्रजी माध्‍यमातील मुले इंग्रजी चित्रपट, साहित्‍य यांच्‍या अधिक संपर्कात येतात. मद्य, सिगारेट, अमली पदार्थ, अंगप्रदर्शन करणारे पोषाख, विचित्र अंगविक्षेप करून नाचणे, विवाहबाह्य संबंध, विवाहापूर्वी एकत्र रहाणे, निसर्गचक्राच्‍या विरोधातील दैनंदिन जीवनपद्धत या गोष्‍टी सर्वसामान्‍य मध्‍यमवर्गीय कुटुंबात सामान्‍य होत आहेत किंवा झाल्‍या आहेत. आज आंग्‍लविकृतीच्‍या अतिरेकाने मुलांचे जीवनच तमोगुणी होऊन त्‍यांची कुटुंबव्‍यवस्‍था, जीवनातील सुख-शांती उद़्‍ध्‍वस्‍त होत आहे. त्‍यामुळे ‘भीक नको; पण कुत्रा आवर’, असे म्‍हणण्‍याची वेळ आली आहे. आपली संस्‍कृती ही केवळ अन्‍यांप्रमाणे नाही, तर ‘मानवी जीवन जगण्‍याचा तो सर्वोत्तम पर्याय’ आहे. भाषा सोडल्‍याने तिच्‍यावरच असे आघात होत असतील, म्‍हणजे ‘जीवन जगण्‍याची सर्वोत्तम पद्धत’च बिघडून जात असेल, तर अशा भाषेचा पर्याय काय कामाचा ?

३ अ. मराठी (भारतीय) महिने आणि तिथी यांचे विस्‍मरण ! : सध्‍या सर्वच जण इंग्रजी कालगणनेप्रमाणे महिने आणि दिनांक यांचा वापर करतात. त्‍यामुळे मराठी मास आणि तिथी यांचे विस्‍मरण झाले आहे. मराठी दिनदर्शिकेत इंग्रजी दिनाकांवर तिथी लिहिलेली असते म्‍हणून ती लक्षात येते. ‘तिथी’ लक्षात न येणे, म्‍हणजे सनातन हिंदु संस्‍कृतीलाच तिलांजली देण्‍यासारखे आहे; कारण सनातन संस्‍कृतीतील सर्व सणवार, उत्‍सव आदी सर्वच तिथीनुसार होतात. सध्‍या तिथीच्‍या दिवशी येणार्‍या दिनांकानुसार सण ‘साजरे’ होतात; परंतु तिथी विसरल्‍याने साहजिकच तिच्‍याशी निगडित असलेलेे ‘धर्माचरण’ विसरले जात आहे. इंग्रजी भाषेच्‍या वापराने स्‍वसंस्‍कृतीला कशी तिलांजली दिली जाते, हे याचे उत्तम उदाहरण आहे. ‘इंग्रजी भाषा आणि संस्‍कृती यांच्‍या जवळीकीमुळे आपण आपले जीवन, सर्वस्‍व कसे गमावून बसत आहोत ?’, हे लक्षात येणारी अशी असंख्‍य उदाहरणे आहेत. मराठीच्‍या पुरस्‍काराची अत्‍यावश्‍यकता बिंबवण्‍यासाठी धार्मिक, आध्‍यात्मिक संस्‍था, संप्रदाय आदींनी हे जनतेच्‍या लक्षात आणून दिले पाहिजे.

३ आ. ‘स्‍वभाषेचा पुरस्‍कार हा आपल्‍या संस्‍कृतीच्‍या, म्‍हणजेच अंतिमतः आपल्‍या अस्‍तित्‍वाशी निगडित आहे’, हे प्रत्‍येक मराठीजनाने स्‍वतःवर बिंबवून घ्‍यायला हवे, जेणेकरून मराठीच्‍या आग्रहासाठी त्‍यांना सतत प्रेरणा मिळत राहील आणि स्‍वभाषेच्‍या आग्रहासाठी धरावयाच्‍या प्रयत्नांची अपरिहार्यता लक्षात येईल.

४. भाषा आणि राष्‍ट्र अभिमानाचे परस्‍परावलंबित्‍व शासनासह जनतेवर बिंबवायला हवे !

‘स्‍वभाषाभिमान असला, तर राष्‍ट्राभिमान निर्माण होण्‍यास आणि तो असला, तर भाषाभिमान जोपासण्‍यास साहाय्‍य होते’, हे परस्‍परावलंबित्‍व मनावर बिंबवले गेले पाहिजे. अनेक भारतीय विदेशी उत्‍पादने वापरतात. या उत्‍पादनांवर कित्‍येकदा त्‍यांच्‍या भाषेत ती उत्‍पादने किंवा खाद्यपदार्थातील घटक यांची माहिती असते; परंतु त्‍या देशातील लोक त्‍यांची वस्‍तू परदेशात जाते म्‍हणून त्‍यांच्‍या भाषेचा वापर करणे सोडत नाहीत; उलट भारतियांमध्‍ये भाषा आणि राष्‍ट्र यांच्‍याविषयीचा अभिमान अल्‍प असल्‍याने ते सहजपणे विदेशी वस्‍तू वापरतात किंवा खाद्यपदार्थ घेतात.

५.  मराठी तंत्रज्ञानाची भाषा होण्‍याची प्रक्रिया जोमाने चालू केली पाहिजे !

अ. तंत्रज्ञानाचे विषय मराठी भाषेत सर्वत्र शिकवले जाऊ लागले, तर इंग्रजी भाषेचे महत्त्व आपोआपच न्‍यून होईल, तसेच इंग्रजी माध्‍यमात शिकण्‍याची संख्‍या न्‍यून होईल आणि आस्‍थापनांमध्‍येही इंग्रजी भाषेपेक्षा स्‍थानिक भाषांचे प्रस्‍थ वाढेल.

आ. पालकांमध्‍ये धर्म, संस्‍कृती, राष्‍ट्र यांच्‍याविषयी प्र्रखर अभिमान असेल, तर पालक त्‍यांच्‍या पाल्‍याला मराठी माध्‍यमात घातल्‍याविना रहाणार नाहीत. सर्व मराठीजनांनी मुलांना शालेय शिक्षण मराठी माध्‍यमातूनच द्यायचा निर्धार केला, तर पुढे त्‍यांच्‍या सहभागातूनच मराठी सहजगत्‍या तंत्रज्ञानाची भाषा का होणार नाही ?

इ. केंद्रशासनाने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्‍यासक्रम भारतीय भाषांमध्‍ये करण्‍याची प्रक्रिया चालू केली आहे. त्‍याला हातभार लावण्‍यासाठी जनतेनेही प्रतिसाद दिला पाहिजे. संगणकीय तंत्रज्ञान आणि त्‍यांचे शब्‍द मराठीत कसे येतील, हेही पाहिले पाहिजे.

६. राज्‍यातील सर्वच व्‍यवहारांची भाषा मराठी होणे आवश्‍यक !

मराठीच्‍या संवर्धनासाठी सर्वत्र मराठीत बोलणे, संवाद साधणे, लिहिणे, व्‍यवहार करणे ही महत्त्वाची सूत्रे आहेत. त्‍यामुळे त्‍याचा आग्रह, प्रसंगी नियमांचे पालन करण्‍याची सक्‍ती आणि प्रसंगी दंड अशी काही प्रावधाने (तरतूद) केली, तर मराठीचा वापर वाढण्‍यास साहाय्‍य होऊ शकते. यासाठी गिरीश दाबके यांचे उदाहरण आदर्श ठरेल. त्‍यांचा जर्मनीत उत्‍पादन केलेला छायाचित्रक (कॅमेरा) बिघडल्‍याने त्‍यांनी जर्मनीला संबंधितांना इंग्रजीत पत्र पाठवले. त्‍यांना आलेल्‍या उत्तरात म्‍हटले होते, ‘तुम्‍ही तुमच्‍या मातृभाषेत किंवा हिंदीत पत्र पाठवा. आम्‍ही भाषांतर करून घेऊ. आम्‍ही इंग्रजीतील पत्रांना उत्तरे देत नाही.’ असा धडा आपल्‍याकडील सर्व आस्‍थापने जेव्‍हा गिरवू लागतील, तेव्‍हा सर्वांना मराठीत व्‍यवहार करण्‍याविना पर्याय उरणार नाही आणि तेव्‍हा खर्‍या अर्थाने भाषेचे सवंर्धन चालू होईल.

(क्रमशः पुढच्‍या शनिवारी)

– सौ. रूपाली अभय वर्तक, एम्.ए. (मराठी), बी. लिब. (ग्रंथालय व्‍यवस्‍थापन पदवी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१.२०२५)

 


भाषेच्‍या सात्त्विकतेचा व्‍यक्‍तीजीवन पर्यायाने समाजजीवन यांच्‍याशी असलेला घनिष्‍ठ संबंध

सुश्री सुप्रिया नवरंगे

१. सात्त्विक भाषा बोलल्‍याने सात्त्विक स्‍पंदने निर्माण होणे

आपण जे बोलतो, त्‍यातून नाद उत्‍पन्‍न होतो. या नादाची स्‍पंदने आपल्‍या सभोवतालच्‍या वातावरणात पसरतात. आपण चांगले बोललो, तर आपल्‍याभोवती चांगली स्‍पंदने निर्माण होतात आणि ती आपल्‍याला सकारात्‍मक ऊर्जा देतात. वाईट बोललो, तर वाईट स्‍पंदने निर्माण होतात आणि ती आपल्‍याला नकारात्‍मक ऊर्जा देतात. आधुनिक विज्ञानानेही हे सूत्र मान्‍य केले आहे. सकारात्‍मक स्‍पंदने ग्रहण केल्‍याने माणसे सन्‍मार्गी बनतात, तर नकारात्‍मक स्‍पंदने ग्रहण केल्‍याने माणसे तमोगुणी आणि वाईट मार्गाने जाणारी बनतात. हे लक्षात घेता आपण जर सात्त्विक भाषा बोललो, तर आपल्‍याभोवती सात्त्विक स्‍पंदने निर्माण होतील आणि त्‍यांतून आपल्‍याला चैतन्‍य प्राप्‍त होईल.

२. नैतिक मूल्‍ये समाजात रुजण्‍यासाठी समाज सात्त्विक असणे आवश्‍यक !

विविध प्रकारच्‍या संशोधनांवरून असे आढळले आहे की, देवभाषा संस्‍कृत ही सर्वाधिक सात्त्विक भाषा आहे. सध्‍या आपल्‍याकडे संस्‍कृत ही दैनंदिन व्‍यवहाराची भाषा नाही; परंतु संस्‍कृतपासून निर्मिती झालेली मराठी ही आपली दैनंदिन व्‍यवहाराची भाषा आहे. ही मराठीच जर आपण अधिकाधिक शुद्ध बोललो आणि शुद्ध लिहिली, तरी आपल्‍या आजूबाजूचे वातावरण सात्त्विक होण्‍यास पुष्‍कळ साहाय्‍य होईल. समाजात नैतिक मूल्‍ये रुजवण्‍यासाठी समाज सात्त्विक असणे आवश्‍यक असते.

समाजाला सात्त्विक बनवणारे जे अनेक घटक आहेत, त्‍यांपैकी एक महत्त्वाचा घटक म्‍हणजे, ‘मूल जन्‍मल्‍यापासून त्‍याच्‍या कानांवर पडणारी त्‍याची भाषा होय.’ एवढे महत्त्व समाजाच्‍या जडणघडणीत भाषेला आहे.

३. भाषेची शुद्धता, म्‍हणजेच सात्त्विकता जपण्‍यात सर्वांचे हित !

त्रेतायुगातील रामराज्‍यात प्रजा सुरक्षित होती. याच्‍या अनेक कारणांपैकी एक कारण म्‍हणजे त्‍या काळी दैनंदिन व्‍यवहाराची भाषा संस्‍कृत होती. या उदाहरणावरून मौखिक आणि लिखित भाषेच्‍या शुद्धतेचे अन् शुद्धतेमुळे तिच्‍यात निर्माण होणार्‍या सात्त्विकतेचे महत्त्व आपल्‍या लक्षात येते. अर्थातच ही शुद्धता, म्‍हणजेच सात्त्विकता जपणे, हे सर्वांचे सामूहिक दायित्‍व आहे आणि ते पेलण्‍यातच सर्व समाजाचे हित आहे.

– सुश्री सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२८.१.२०२५)

 

संपादकीय भूमिका

तंत्रज्ञानाचे विषय इंग्रजी भाषेऐवजी मराठी, म्‍हणजेच मातृभाषेत शिकवले जाण्‍यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !