प्रयागराज कुंभपर्व २०२५
|

प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्याच्या प्रारंभीपासूनच अनेक संत-महंत, महामंडलेश्वर यांनी हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला आहे. यावर पुढचे पाऊल टाकत हिंदु राष्ट्राची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनेक संत, महंत, महामंडलेश्वर महाकुंभमेळ्यात आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनात एकवटले. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार करत अधिवेशनात एकवटलेल्या संतांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. संतांचे धर्मतेज आणि क्षात्रतेज धर्मकार्यासाठी प्राप्त होण्यासाठी या वेळी अधिवेशनाला उपस्थित धर्मप्रेमींनी प्रार्थना केली आणि हिंदु राष्ट्रासाठी कंबर कसून कार्य करण्याचा निर्धार केला.
#MahaKumbh2025
🔱 #महाकुंभ की पावन धरा में #हिन्दुराष्ट्र का शंखनाद करने हेतु……🌼 मंगलमय वातावरण एवं संतों के करकमलों से 🪔 दीपप्रज्वलन द्वारा अधिवेशन का उत्साहपूर्ण वातावरण में शुभारंभ !
आयोजक : अखिल भारतीय धर्म संघ एवं हिन्दू जनजागृति समिति
Register online :… pic.twitter.com/NfAQedcvwI
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 31, 2025
३० नोव्हेंबर या दिवशी ‘अखिल भारतीय धर्मसंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने सेक्टर १९ मधील मोरी-संगम लोअर मार्गावरील अखिल भारतीय धर्मसंघाच्या शिबिरामध्ये दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत या हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हम भारत भव्य बनायेंगे, हम हिंदु राष्ट्र बनायेंगे’, ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’ या उद्घोषात संत, महंत आणि मान्यवरांचे अधिवेशनस्थळी स्वागत करण्यात आले. विविध आखाड्यांचे संत-महंत, महामंडलेश्वर आणि आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मोठा उत्साह होता. हा उत्साह सर्वांच्या मार्गदर्शनातून व्यक्त होतांना दिसला. विविध संघटनांचे कार्य वेगवेगळे असले, तरी हिंदु राष्ट्राची स्थापना हर सर्वांचा अजेंडा (कार्यसूची) आहे. त्यामुळे या उद्देशाने संघटित कार्य करण्याचे आवाहन वक्त्यांनी मार्गदर्शनाद्वारे केले.

असे झाले अधिवेशन !
१. शंखनादाने अधिवेशनाला प्रारंभ झाला. पुरोहित श्री. उज्ज्वल तिवारी यांनी शंखनाद केला. श्री स्वामी करपात्री वेदशास्त्र अनुसंधान केंद्र अखिल भारतीय धर्मसंघाचे वेद अध्यापक श्री. आशुतोष झा आणि श्री. अनुपकुमार द्विवेदी यांनी वेदपठण केले.
२. यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’चे उपसंपादक श्री. नीलेश कुलकर्णी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील योगदानाची माहिती दिली.
३. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी व्यासपिठावर उपस्थित सर्व संतांचा पुष्पहार आणि रुद्राक्षाची माळ घालून आणि शाल देऊन सन्मान केला. यानंतर संतांनी त्यांचे आशीर्वचनपर आणि क्षात्रतेजयुक्त मार्गदर्शन केले.
Sadhus and Saints Resolve to Establish a Dharma-Based Hindu Rashtra at the ‘Hindu Rashtra Adhiveshan’ in Mahakumbh Prayagraj, jointly organised by Akhil Bharatiya Dharmasangh and @HinduJagrutiOrg
Spontaneous participation of Saints, Mahants, Mahamandaleshwars and devout Hindus!… pic.twitter.com/fwXhCcDEkA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 31, 2025
वंदनीय आणि महनीय उपस्थिती !
आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी गंगासागर परमहंस, अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्राचे महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज, स्वामी भारतानंद महाराज, स्वामी रमेशानंद सरस्वती, महंत स्वामी वासुदेवानंद गिरि महाराज (कैलास आश्रम, अमरावती), संत सुखदेव महाराज, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
महाकुंभमेळ्यातील हिंदु राष्ट्र अधिवेशनात संत-महंतांनी मांडलेले उद्बोधक विचार
हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही ! – ब्रह्मचारी शंकर चैतन्य महाराज, धर्मसंघ पीठाधीश्वर, दुर्गाकुंड, वाराणसी

प्रयागराजमधील महाकुंभक्षेत्र हे अनादी काळापासून हिंदूंची भूमी आहे. कुंभकाळात येथे देवीदेवता, संत, महात्मे साधनेसाठी येतात. ही अनादी काळापासूनची परंपरा आहे. अशी देवभूमी वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे, असे म्हणण्याचे कुणाचे धारिष्ट्य होते तरी कसे ? असे म्हणणार्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही. त्यांनी भारत सोडून चालते व्हावे. भारत हा हिंदूंचा देश आहे. येथे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही.
या वेळी ब्रह्मचारी शंकर चैतन्य महाराज म्हणाले,
१. धर्मसंघ पीठाधीश्वर, दुर्गाकुंड, वाराणसी येथे तेहतीस कोटी देवतांचा वास असलेल्या गोमातेची हत्या केली जात आहे.
२. गोमतेच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदूंने गोमातेचे पालन करायला हवे. शक्य नसेल, तर १० हिंदूंनी मिळून तरी गोपालन करावे.
३. गोहत्या रोखण्यासाठी हिंदूंनी लवकरात लवकर ठोस भूमिका घ्यावी. गोहत्या हा सनातन धर्मावरील आघात आहेत. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.
ब्रह्मचारी शंकर चैतन्य महाराज, धर्मसंघ पीठाधीश्वर, दुर्गाकुंड, वाराणसी यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक !हिंदु जनजागृती समितीचे अनेक कार्यकर्ते डॉक्टर, अभियंता आदी उच्चशिक्षित आहेत. हे सर्वजण समर्पित होऊन धर्मकार्य करत आहेत. त्यांचा त्याग लक्षात घेऊन प्रत्येक हिंदूने थोडा वेळ तरी धर्मकार्यासाठी द्यावा, अशा प्रकारे ब्रह्मचारी शंकर चैतन्य महाराजांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. |
हिंदू धर्माप्रती संवेदनशील होत नाहीत, तोपर्यंत हिंदुत्व धोक्यात ! – आनंददास भैय्याजी महाराज

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी प्रथम स्वत:ची व्यवस्था निर्माण करायला हवी. धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी प्रथम धर्माला धारण करायला हवे. धर्माप्रती हिंदू संवेदनशील होत नाहीत, तोपर्यंत हिंदू विभागले जातील. हिंदूंच्या हत्या थांबणार नाहीत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.
भारत राज्यघटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक ! – श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्वरमाऊली सरकार, पीठाधीश्वर, श्री रुक्मिणी विदर्भ पीठ

भारत देश राज्यघटनेद्वारे चालत आहे. त्यामुळे भारताला राज्यघटनेद्वारे हिंदु राष्ट्र घोषित करायला हवे. आजही अनेकजण पाकिस्तानधार्जिणे आहेत. क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकल्यावर जे फटाके फोडतात. जे हिंदु राष्ट्राला घटनाविरोधी म्हणतात, त्यांनी लक्षात घ्यावे की, भारताची राज्यघटना हिंदूंमुळेच सुरक्षित आहे. ‘कटेंगे तो बटेंगे’ (विभागले गेलो, तर मारले जाऊ) ही घोषणा हिंदूंसाठीच आहे. सद्य:स्थितीत असंख्य हिंदू पाश्चात्यांचे अनुकरण करत आहेत. हिंदूंनी धर्म समजून त्यानुसार आचरण करायला हवे. मुंग्या छोट्या असल्या, तरी त्या एकत्र येऊन मोठ्या अजगरालाही मारू शकतात. हिंदू विभागले गेल्यामुळेच संकटात आहेत. धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.
आम्हाला धर्माधिष्ठीत राज्यव्यवस्थेसह हिंदु राष्ट्र हवे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

राजधर्म हे हिंदु राष्ट्राचे एक अंग आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मपरायण आणि चारित्र्यसंपन्न समाजाची निर्मिती होणेही आवश्यक आहे. सनातन परंपरेमध्ये हिंदु राज्य आणि राष्ट्र एकत्र असते. राजा असतो तेथे राजगुरु, राजदंड, धर्मदंड असतो. परंपरेनुसार भारताला आपण हिंदु राष्ट्र म्हणतो, तेव्हा ते यानुसार असणे अपेक्षित आहे. इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यासाठी ख्रिस्ती आणि युरोपीय पद्धतीनुसार राज्य आणि राष्ट्र ही संकल्पना वेगळी केली. इंग्रजांनी धर्माला राज्य कारभारापासून वेगळे केले. आपण परंपरागत हिंदु राष्ट्र असलो, तरी राज्यघटनेनुसार आणि धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेसह आम्हाला हिंदु राष्ट्र हवे आहे. राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ हा शब्द हटवून भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जावे, तसेच लोकसंख्या नियंत्रण, धर्मांतरबंदी, गोहत्याबंदी कायदे लागू केले जावेत, राज्यघटनेद्वारे अल्पसंख्यांकांसाठी करण्यात आलेली विशेष प्रावधाने (तरतूद) रहित करावी, अशा केंद्र सरकारकडून अपेक्षा आहे.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपणाला दृढ निश्चय करावा लागेल ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, उत्तर पूर्व भारताचे मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

शतकानुशतके, आमच्या तेजस्वी हिंदु संस्कृतीवर आक्रमण झाले आहे. ज्यामुळे हिंदु समाज त्रस्त झाला आहे. आपल्या धर्मावर आलेल्या संकटांचे निवारण आपणालाच काढायला हवे. उत्तरप्रदेशातील संभल येथे हिंदूंची मंदिरे नष्ट करण्यात आली. अशा प्रकारे आपली सांस्कृतिक परंपरा नष्ट करण्यात आल्यास आपले अस्तित्वच शेष रहाणार नाही. गोहत्या, लव्ह जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्ड या धर्मावरील संकटांचे हिंदूंना निवारण करावेच लागेल. हिंदु युवती, हिंदु मंदिरे यांना आम्ही अवमानित होऊ देणार नाही. यासाठीच हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपणाला दृढ निश्चय करावा लागेल. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतच हिंदूंचे भविष्य सुरक्षित राहिल. जेथे हिंदूंच्या परंपरांचा सन्मान राखला जाईल, असे हिंदु राष्ट्र आपणाला स्थापन करायचे आहे. हिंदु धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी भारतात घटनात्मक हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. यासाठी आमचा संयुक्त प्रयत्न, आमची अतूट वचनबद्धता आवश्यक आहे. घटनात्मक हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे अंतिम ध्येय आहे. भारताला घटनात्मक संशोधनाच्या द्वारे हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करणे हे वैचारिक आंदोलन आहे. हिंदु राष्ट्रामुळे संपूर्ण मानवजातीचे हित जोपासले जाईल.
हिंदूंवरील आघातांना सातत्याने वाचा फोडणारे ‘सनातन प्रभात’ एकमेव ! – नीलेश कुलकर्णी, उपसंपादक, सनातन प्रभात

हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या महाकुंभपर्वाच्या विशेषांकाचे प्रकाशन केल्यानंतर सनातन प्रभातचे उपसंपादक श्री. नीलेश कुलकर्णी म्हणाले, ‘‘२५ वर्षांपूर्वी जेव्हा हिंदु किंवा सनातन हा शब्द उच्चारणेही जणू गुन्हा मानले जात होते, तेव्हापासून, म्हणजे २५ वर्षांपूर्वी आम्ही ‘सनातन प्रभात’ नियतकालिक प्रकाशित करत आहोत. तेव्हापासून आम्ही हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध आहोत. केवळ ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातूनच हिंदूंवरील लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर आदी आघातांना सातत्याने वाचा फोडली जाते. संतांच्या आशीर्वादाने चालणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव वृत्तपत्र आहे. अशा ‘सनातन प्रभात’चे सर्व हिंदूंनी सदस्य (वर्गणीदार) बनून धर्मकार्यात योगदान द्यावे.’’
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘फेक नेरेटिव्ह’चा बीमोड आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती![]() कोणत्याही प्रत्यक्ष युद्धापूर्वी बौद्धिक युद्धाची आवश्यकता असते. महायुद्धाच्या वेळी अर्जुनाला शस्त्रत्याग करण्याचा जो भ्रम निर्माण झाला, त्यालाच ‘फेक नेरेटिव्ह’ (खोटे कथानक) म्हणतात. अर्जुनाला ‘फेक नेरेटिव्ह’मधून बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश केला. वर्तमान काळातही हिंदु राष्ट्राच्या विरोधी ‘फेक नेरेटिव्ह’ निर्माण करून हिंदूंना भ्रमित केले जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व समजून घेतले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना करता येईल. |
नेपाळला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी भारताने साहाय्य करावे ! – शंकर खराल, विश्व हिंदु महासंघ, नेपाळ

अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे बांगलादेशात सत्तापरिवर्तन झाले. भारतात नागालँड, बंगाल या राज्यांमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणत धर्मांतर होत आहे. नेपाळमध्येही हीच स्थिती आहे. नेपाळला बांगलादेश आणि रोहिंग्या यांच्या घुसखोरीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे नेपाळ हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी भारताचे साहाय्य आवश्यक आहे.
भारतात गुरुकुल स्थापन व्हावेत ! – डॉ. मुरलीधर दास, इस्कॉन

आपला आहार सात्त्विक हवा, तरच आपले विचार सात्त्विक बनतील. यासह भारतात गुरुकुल स्थापन व्हावेत, जेणेकरून हिंदूंना हिंदु धर्माचे शिक्षण मिळेल आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्ग सुकर होईल.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारताचा सांस्कृतिक वारसा जपणे आवश्यक ! – जुगलकिशोर तिवारी, संस्थापक, ब्राह्मण एकता परिषद

सनातन धर्म कधी नष्ट होणार नाही, असा भ्रम निर्माण केला जात आहे; परंतु हिंदू नष्ट होत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. हिंदु धर्माची पूनर्स्थापना हे ईश्वरी कार्य आहे आणि ते होणारच आहे; मात्र त्यासाठी हिंदू शिल्लक रहाणे आवश्यक आहे. हिंदू स्वत:ची ओळख लपवत आहेत. स्वत:च्या धर्माला दुर्लक्षित केले, तर जगही हिंदूंना दुर्लक्षित करील. केवळ गंगेमध्ये स्नान करून हिंदु धर्माची रक्षा होणार नाही, तर गंगामातेचे म्हणजे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण केले तरच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य आहे.
बांगलादेशातील हिंदूंना भारताकडून साहाय्याची आवश्यकता ! – परिमलकुमार राय, बांगलादेश

बांगलादेशामध्ये १ वर्षापूर्वी १ लाख हिंदूंची घरे जाळण्यात आली. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले. बांगलादेशातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. बांगलादेशातील हिंदूंना भारताकडून साहाय्याची आवश्यकता आहे.
हिंदूंनी जातीपातींत न विखुरता हिंदु म्हणून संघटित व्हावे ! – श्रीमहंत वासुदेवानंदगिरीजी महाराज

आज हिंदू जातीयवाद, प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद आदींमध्ये अडकले आहेत. त्यामुळे ते विखुरले गेले आहे. हे टाळण्यासाठी हिंदूंनी हिंदु म्हणून संघटित व्हावे. ‘संघे शक्ति कलौयुगे’ (कलियुगात संघटित रहाण्यातच हित आहे) हे हिदूंनी लक्षात ठेवावे.
महाकुंभपर्वात हिंदु राष्ट्राचे फलक हटवले जाणे चुकीचे ! – प.पू. भगीरथी महाराज, विहिंप

महाकुंभपर्वात प्रशासनाकडून हिंदु जनजागृती समितीचे फलक हटवण्यात आले. ही कृती चुकीची आहे. ही श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची भूमी आहे. त्यामुळे भारत हिंदु राष्ट्र बनणार आहे, हे निर्विवाद आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना कुणीही त्रास देऊ नये; कारण या संस्थांना संतांचे आशीर्वाद आहेत आणि संतांच्या आशीर्वादाने त्यांचे कार्य चालू आहे.
