हिंदुत्वाचा धगधगता निखारा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होय ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री. नितीन शिंदे, तसेच अन्य

सांगली – छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर भगवा झेंडा, देश आणि धर्म यांसाठी जी तळमळ पाहिजे, ती केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यात दिसून येते. हिंदुत्वाचा धगधगता निखारा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना ! आज महाराष्ट्राला अन् देशाला अशाच प्रखर देशाभिमान असणार्‍या नेत्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीचे औचित्य साधून टिंबर एरिया येथे पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. त्या वेळी ते बोलत होते. श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत काम करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य समजतो.’’ या वेळी सर्वश्री प्रसाद रिसवडे, अनिल शेटे, मनोज साळुंखे, नितीन कोरे, गजानन मोरे, संजय जाधव, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव यांसह अन्य उपस्थित होते.