पाकिस्तान आणि तालिबान संघर्षाची रणभूमी ‘वाखान कॉरिडॉर’ !

(टीप : ‘वाखान कॉरिडॉर’ हा अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात स्थित भूमीचा पट्टा किंवा सुसज्ज महामार्ग आहे.)

१. ‘वाखान कॉरिडॉर’विषयी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष

‘पाकिस्तान आणि अफगाण तालिबानमधील तणाव गंभीर होत चालला आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई आक्रमणानंतर तालिबानी आतंकवाद्यांनीही चोख प्रत्युत्तर देत अनेक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. एवढेच नाही, तर तालिबानने असेही म्हटले आहे की, ते पाकिस्तानशी असलेली सीमारेषा, म्हणजेच ‘ड्युरंड लाईन’ स्वीकारत नाहीत. तालिबान हे पाकिस्तानातील पेशावर शहरावरही त्यांचे नियंत्रण असल्याचा दावा करत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ‘चिकन नेक’ (अफगाणिस्तानच्या बदख्शा प्रांतात असलेल्या भूमीची एक पातळ पट्टी) असलेल्या ‘वाखान कॉरिडॉर’वर लक्ष केंद्रित केले आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’च्या प्रमुखांनी अलीकडेच ताजिकिस्तानला भेट दिली आणि तेथे त्यांनी ‘वाखान कॉरिडॉर’विषयी तालिबानच्या विरोधकांशी चर्चा केली. या काळात ‘वाखान कॉरिडॉर’वरील ताजी माहिती अशी आहे की, चिनी गुप्तचर संस्थेच्या सदस्यांनी ८ जानेवारी या दिवशी ‘वाखान कॉरिडॉर’ला भेट दिली आणि त्यांनी तालिबानला चेतावणी दिल्याचे म्हटले जात आहे.

२. पाकिस्तानी सीमेवरील कारवाया थांबवण्याविषयी चीनची तालिबानला चेतावणी

तालिबान हे वाखान कॉरिडॉरला अफगाणिस्तानचे शीर समजतात. हा ३५० किलोमीटर लांबीचा आणि ३४ किलोमीटर रुंदीचा कॉरिडॉर असून पाकिस्तान, ताजिकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान या ४ देशांना जोडतो. वर्ष २०११ पासून तालिबानविरोधी गट असलेल्या ‘अफगाणिस्तान ग्रीन ट्रेंड’ने खुलासा केला की, चीनच्या सैनिकी गुप्तचर विभागातील ३  अधिकार्‍यांनी ८ जानेवारी या दिवशी वाखान कॉरिडॉरला भेट दिली होती. हे चिनी अधिकारी १२ जानेवारीपर्यंत अफगाणिस्तानातील बदख्शान प्रांतात राहिले. या चिनी अधिकार्‍यांशी तालिबानी सुरक्षा कर्मचार्‍यांनी संगनमत केले होते. ‘अफगाणिस्तान ग्रीन ट्रेंड’ने म्हटले आहे की, सीमेवर कोणत्याही प्रकारची कारवाई थांबवण्यास चीनने तालिबानला स्पष्टपणे सांगितले आहे.

३. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीन यांच्यासाठी वाखान कॉरिडॉरचे महत्त्व

चीनला भीती आहे की, उघूर मुसलमान वाखान कॉरिडॉर येथे त्यांच्या कारवाया करत आहेत, जो त्यांच्या शिनझियांग प्रांतासाठी धोका आहे. ‘अफगाणिस्तान ग्रीन ट्रेंड’नुसार चीनच्या चेतावणीनंतर तालिबानने आता एक आयोग स्थापन केला आहे, जो बीजिंगला सहकार्य करील. ‘अफगाणिस्तान ग्रीन ट्रेंड’च्या मते सध्या असे दिसते की, तालिबानने काही प्रमाणात वाखान कॉरिडॉरवरील त्याचे वर्चस्व चीनच्या प्रभावाखाली सोडले आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी या ताज्या घडामोडींवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘‘असे दिसते की, चीन कुणावरही विश्वास ठेवत नाही. चीनची भूमिका अशीच चालू राहील का ?’’

वाखान कॉरिडॉर हा वर्ष १८९३ च्या ‘ड्युरंड रेषा करारा’चा एक भाग आहे, जो ब्रिटीश काळात स्वाक्षरी करण्यात आला होता. हे रशिया आणि ब्रिटीश साम्राज्यामधील ‘बफर झोन’ (तटस्थ क्षेत्र) म्हणून निर्माण करण्यात आले होते. या भागात १२ सहस्र लोक रहातात. मध्य आशियातील देशांशी थेट संपर्क साधता यावा; म्हणून पाकिस्तानला हा ‘कॉरिडॉर’ कह्यात घ्यायचा आहे. तालिबान आणि भारत यांच्यातील वाढत्या मैत्रीनंतर पाकिस्तानने वाखान कॉरिडॉरविषयी दबाव वाढवला आहे. त्याच वेळी ‘कुणी वखान कॉरिडॉर कह्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना योग्य उत्तर दिले जाईल’, अशी चेतावणी तालिबानने दिली आहे. पाकिस्तानी विश्लेषकांच्या मते जोपर्यंत चीन ताजिकिस्तानला मान्यता देत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानला वाखान कॉरिडॉर कह्यात घेणे शक्य होणार नाही.’

– शैलेश कुमार शुक्ला

(साभार : दैनिक ‘नवभारत टाइम्स’, १४.१.२०२५)