राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद : एक ध्येय एक विचार !

आज स्वामी विवेकानंद यांची तिथीनुसार जयंती आहे. त्या निमित्ताने…

१२ जानेवारीला राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती दिनांकानुसार असते. भारतमातेच्या या २ श्रेष्ठ रत्नांची जयंती एकाच दिवशी असते, हा किती सुंदर योगायोग आहे. जिजाऊसाहेब यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ या दिवशी सिंदखेडराजाला (जिल्हा बुलढाणा) महाराष्ट्रात झाला आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ या दिवशी कोलकाताला (बंगाल) झाला. तसे पहायला गेले, तर या दोघांच्या जन्मात २५० वर्षांहून अधिक अंतर आहे, दोन्ही ठिकाणे अगदी भिन्न आहेत आणि काळही पुष्कळ वेगळा आहे; पण नीट विचार केला, तर दोघांच्या आयुष्यात अनेक साधर्म्य पहायला मिळतील. त्या दोघांच्या आयुष्याची तुलना करणे कुणालाही चुकीचे वाटेल; पण आपण कुतूहल म्हणून तरी यातील साम्य शोधू शकतो. दोघांनी आपापल्या आयुष्यात अनेक महान कार्य केली आहेत. आपापल्या काळात जिजाऊमाता आणि स्वामीजी महान उंचीवर जाऊन बसले; पण असे वाटते की, दोघांचा पाय एकच होता. हे दोघेही ज्या विचारांनी प्रेरित होते, ते विचार एकच होते. दोघांचे ध्येय एकच होते. म्हणूनच कदाचित् परमेश्वराने काळ भिन्न असला तरीसुद्धा दोघांना एकाच दिवशी जन्माला आणले.

राजमाता जिजाऊ

१. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्माच्या वेळची परिस्थिती

स्वामीजी आणि जिजाऊमाता यांचा जन्म पारतंत्र्यातच झाला. जिजाऊमातेच्या जन्माच्या वेळी इस्लामी सत्ता होती, तर स्वामीजींच्या जन्माच्या वेळी इंग्रजांची सत्ता होती. दोघांच्याही जन्माच्या वेळी भारतामध्ये कुणीतरी नवचैतन्य निर्माण करण्याची आवश्यकता होती. जिजाऊंच्या जन्माच्या वेळी भारतातील प्रचंड साम्राज्ये मोगल आणि इतर इस्लामी शासकांनी कपटाने संपवली होती. कुणीही याविरोधात उठून उभे रहायच्या आधीच हे लोक त्याला संपवून टाकत असत. सर्वसामान्य माणसांचे आयुष्य राजसत्तेने भयग्रस्त करून टाकले होते. माणसांचा स्वतःवरील विश्वासच उडून गेला होता. आपण उठून उभे राहू शकतो, यावरचा विश्वास संपला होता. आपणही सामर्थ्यशाली होतो आणि आहोत, ही गोष्ट लोक विसरले होते. अशा वेळी माता जिजाऊ उठून उभ्या राहिल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात सोन्याचा नांगर देऊन ही पवित्र भूमी नांगरायला लावली. त्यांनी केवळ भूमीच नाही, तर माणसांची मने नांगरली. त्यांनी विश्वास दिला, सामर्थ्य दिले. सामान्य माणसाला त्याच्याच शक्तीची ओळख करून दिली. प्रेताप्रमाणे निष्प्राण  पडलेल्या या भूमीला त्यांनी तिचीच ओळख नव्याने करून दिली.

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांच्या वेळेसही ही भारतभूमी पुन्हा एकदा अशीच निष्प्राण झाली होती. वर्ष १८५७ चा उठाव इंग्रजांनी कपटाने चिरडला होता. त्यामुळे माणसांचा आत्मविश्वास संपून गेला होता. आपल्या नशिबी हे पारतंत्र्य असेच रहाणार, हे लोक मानायला लागले होते. इंग्रज सांगतील तसे वागायला लागले होते. त्यांचे अत्याचार हेच जीवन असे मानून जगू लागले होते. अशा वेळी स्वामीजींनी तरुणांना हाक मारली. त्यांना भारताच्या दिव्य इतिहासाची आठवण करून द्यायला प्रारंभ केला. या भूमीने आजवर किती आक्रमकांना परतवून लावले आहे, याचा हिशोब सांगायला प्रारंभ केला. संघर्षाचा मंत्र आणि स्वाभिमानाची शिकवण देत स्वामीजी तरुणांना हाक मारत भारतभ्रमण करू लागले.

२. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा देशाविषयीचा अभिमान अन् प्रेम !

कु. अन्नदा मराठे

जिजामाता आणि स्वामीजी यांच्यातील आणखी एक साधर्म्य, म्हणजे भारताविषयी असलेला अभिमान अन् प्रेम ! जिजाऊमातेला भारतभूमी कधीच पारतंत्र्यात असलेली पहावत नव्हती. त्या सतत परकीय सत्ता कशी उलथवून लावता येईल, याचा विचार करत असत. छत्रपती शिवाजी महाराज लहान असतांना त्या त्यांना राम-कृष्णांच्या गोष्टी सांगून आपल्या दिव्य इतिहासाची आठवण करून देत असत. त्या सतत ‘आपले राज्य आले पाहिजे, रामराज्य आले पाहिजे’, असे सांगून लहान असलेल्या शिवबाच्या मनामध्ये देशाभिमान आणि हिंदु संस्कृतीचा अभिमान जागृत करत असत. पूर्वी असलेले राजपूत साम्राज्य, राणी पद्मिनीचा जोहार, राजा रामदेवराय आणि देवगिरीचा पाडाव अशा गोष्टी सांगून शिवबाला लढायला सज्ज करत असत. भारतमातेविषयी प्रेम आणि श्रद्धेचे संस्कार करतांना राजमाता जिजाऊ यांनी शिवबांना लढायला शिकवले. भारतमातेसाठी संघर्ष करायला शिकवले. ‘आपण देशासाठी लढले आणि जगले पाहिजे’, हा मंत्र त्यांनी केवळ शिवबांनाच नाही, तर या महाराष्ट्र भूमीला दिला.

स्वामीजींचीही आपल्या देशावर आणि देशाच्या इतिहासावर प्रचंड निष्ठा होती. ‘जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ भारतात आहे आणि ती भारताच्या दैदिप्यमान इतिहासामुळे आहे’, असे ते म्हणत असत. सातत्याने आपल्या भाषणांमधून देशप्रेम शिकवत असत. अनेक प्रसंगांतून त्यांनी त्यांचे देशप्रेम दाखवून दिले आहे. भारताच्या होत चाललेल्या तुकड्यांची त्यांना जाणीव होती. त्यामुळे ते सतत आपल्या विखुरल्या गेलेल्या शक्तींना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असत. ‘ज्यांचे हृदय एकाच सूरात धडधडते, अशा शक्तींनी एकत्र येऊन नवा भारत घडला पाहिजे’, असे त्यांचे स्वप्न होते. भारताची शक्ती युवकांमध्ये आहे, हे स्वामीजींनी ओळखले होते. त्यामुळे ते तरुणांना देशासाठी उभे रहायला शिकवत असत. त्यांनी तरुणांना ‘भारतमातेला पुनर्वैभव प्राप्त होईपर्यंत सुखाने झोपू नका’, हा मंत्र दिला.

३. स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे जिजाऊमाता आणि स्वामीजी !

जिजाऊमाता आणि स्वामीजी यांच्यातील आणखी एक साधर्म्य, म्हणजे नुसताच विचार न करता स्वतःचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने केलेले प्रयत्न ! जिजाऊमाता यांनी अगदी लहान असल्यापासून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पहिले; पण त्यांचे हे स्वप्न मनातच न ठेवता ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाला समर्थ बनवले. केवळ आपल्या मुलापुरताच हा विचार न ठेवता स्वराज्य निर्मितीचा विचार त्यांनी समाजात पेरला आणि ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत येणार्‍या प्रत्येक संकटाला त्यांनी धैर्याने तोंड दिले. स्वराज्य निर्मितीच्या वाटेत अनेक संकटे आली; मात्र प्रत्येक संकटात त्या महाराजांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या. महाराज स्वराज्यात नसतांना त्यांनी स्वराज्याचा कारभार स्वतः पाहिला. त्यांनी अत्यंत शिस्तीने आणि सुसूत्रतेने स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या स्वप्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात त्या जराही कमी पडल्या नाहीत.

स्वामीजींनीही भारतमातेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे महान स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी तरुणांना हाक दिली, जागोजागी व्याख्याने देऊन समाजाला जागृत करण्याचे काम केले. निपचित पडलेला समाज उठून उभा करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले. भारतभ्रमण करतांना देश पारतंत्र्यात पडण्याची कारणे शोधून त्यावर विवेचन केले. केवळ तेवढे करून ते शांत बसले नाहीत, तर उपाय शोधून समाजात जागृती करण्याचे महान कार्य केले. पुढे स्वामीजींनी देहत्याग केला; पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करणे सोडले नाही. ते सातत्याने जनजागृती करत राहिले आणि भारतमातेची महानता समाजाला सांगत राहिले.

भारतातील स्त्रियांविषयी एका इंग्रज व्यक्तीला स्वामीजींनी दिलेले सडेतोड उत्तर

स्वामीजींच्या आयुष्यातील एक प्रसंग नेहमी सांगितला जातो. एकदा एक इंग्रज व्यक्ती स्वामीजींना म्हणाली, ‘तुमच्या देशातील स्त्रिया इतरांजवळ हात का मिळवत नाहीत ?’ त्यावर  स्वामीजींनी प्रतिप्रश्न केला, ‘तुमची राणी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीशी हात मिळवते का ?’ त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘नाही. ती राणी आहे ती प्रत्येकाजवळ हात कशी मिळवेल ?’ यावर स्वामीजी म्हणाले, ‘आमच्या देशातील प्रत्येक स्त्री ही राणीच असते.’ अशा अनेक प्रसंगांतून स्वामीजींनी देशप्रेम, देशनिष्ठा दाखवून दिली आहे.

– कु. अन्नदा विनायक मराठे

४. देव, देश आणि धर्म यांवर अढळ विश्वास असणारे जिजाऊमाता आणि स्वामीजी !

अशी आणखीही साधर्म्य सांगता येतील; पण ही ३ साधर्म्य अधिक महत्त्वाची वाटतात. या दोघांनीही त्यांचे आयुष्य या देशाला वाहिले. महान इतिहासाविषयी केवळ अभिमान न बाळगता पुन्हा महान बनण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. दोन वेगवेगळ्या काळात जन्माला आलेल्या या महान व्यक्तींचे जीवनकार्य एकच होते. कार्यक्षेत्र वेगळे असले, तरी त्यांचा प्रवास एकाच रस्त्यावरचा होता, त्यांचे ध्येय एक होते. दोघांचाही देव, देश आणि धर्म यांवर अढळ विश्वास होता. कदाचित् म्हणूनच आजही दोघांचे जीवन आपल्याला तितकेच मार्गदर्शक ठरते.

– कु. अन्नदा विनायक मराठे,  दापोली, जिल्हा रत्नागिरी. (१७.१.२०२५)

भटकंतीने नरेंद्राला बनवले स्वामी विवेकानंद !

श्री. सिद्धराम पाटील

नरेंद्र विश्वनाथ दत्त नावाचे एक तरुण स्वामी विवेकानंद बनले. यात त्यांच्या भटकंतीचाही मोठा वाटा होता. वर्ष १८८८ ते १८९३ या काळात त्यांनी संपूर्ण भारत पायी तुडवला. ते ऐतिहासिक स्थळांना भेटी देत, तेव्हा तेथील ऐतिहासिक स्पंदनांशी एकरूप होत. भगवी वस्त्रे, कमंडलू आणि गीता या तीन गोष्टी सतत समवेत होत्या. ते पहिल्यांदा पोचले १० सहस्र वर्षांचा इतिहास असलेल्या वाराणसीला. जिथे भगवान बुद्धांनी आणि आदिशंकराचार्यांनी प्रवचने दिली होती त्या स्थानी गेले. राजपुतन्यातील वैभवशाली वास्तू पाहिल्या. काश्मीरमधील क्षीरभवानी मंदिर, एकांतिक धर्मीय (इस्लामी) आक्रांतांनी अनेक वेळा उद्ध्वस्त करूनही पुन्हा पुन्हा उन्नत शिखरांनी उभे राहिलेल्या सोमनाथाला भेट दिली. त्या वेळी ते म्हणाले, ‘पुस्तकांच्या राशी वाचून कळणार नाही, ते सोमनाथाकडे पाहून कळेल.’ त्यांनी बोरिवलीजवळील कान्हेरी लेण्यांत काही काळ घालवला. महाबळेश्वर, बेळगाव, मैसुरू करत दक्षिण टोकाला, म्हणजेच कन्याकुमारीला पोचले. तेथे त्यांना जीवनाचे ध्येय गवसले. भारतवर्षाचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देणे, हे त्यांचे जीवनकार्य बनले. त्यानंतर चालू झाला जगाचा प्रवास. निश्चित ध्येय ठेवून केलेली भटकंती म्हणजे प्रवास. असा प्रवास त्यांनी पुष्कळ केला. कधी जहाजेतून, कधी रेल्वेने, कधी पायी, तर कधी बैलगाडीने. चीन, जपान, युरोप, अमेरिका…. त्यांची अनेक पत्रे प्रवासवर्णनांनी भरली. ‘चालत रहा… सतत चालत रहा…’, हाच त्यांचा संदेश !

– श्री. सिद्धराम पाटील, संपादक, मासिक ‘विवेक विचार’, सोलापूर. (१२.१.२०२५)