
वॉशिंग्टन – भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी नुकताच संसदेत जानेवारी मास ‘तमिळ भाषा आणि वारसा मास’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. प्रस्ताव मांडल्यानंतर राजा कृष्णमूर्ती यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट प्रसारित केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे, ‘एक तमिळ अमेरिकन म्हणून, अमेरिका आणि जगभरातील तमिळ भाषा, वारसा अन् संस्कृतीचा सन्मान करणारा हा ठराव मांडतांना मला अभिमान वाटतो.’
१. पोंगलच्या मुहूर्तावर मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाच्या समर्थनार्थ १४ खासदारांचा गटही राजा यांच्यासमवेत होता. या प्रस्तावाचे समर्थन करणार्यांमध्ये भारतीय वंशाचे ५ खासदार रो खन्ना, अमी बेरा, श्री. ठाणेदार, प्रमिला जयपाल आणि सुहास सुब्रमण्यम यांचा समावेश आहे, तर इतर खासदारांमध्ये इल्हान उमर, जॅन निकोल मल्लिओटाकिस, यवेट क्लार्क, साराह जेकब्स, डेबोरा रॉस, डॅनी डेव्हिस, दिना टायटस, डॉन डेव्हिस आणि समर ली यांचा समावेश आहे.
२. संसदेत मांडलेल्या प्रस्तावात राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, जगभरात तमिळ भाषिकांची संख्या ८ कोटी आहे. यापैकी ३ लाख ६० सहस्र अमेरिकन आहेत. खासदारांनी तमिळ ही जगातील सर्वांत जुनी भाषा असल्याचे नमूद केले आहे.
३. ‘तमिळ अमेरिकन्स युनायटेड’ या अमेरिकेतील तमिळ भाषिकांशी संबंधित असलेल्या संस्थेने या प्रस्तावासाठी राजा कृष्णमूर्ती यांचे आभार मानले आहेत. ‘फेडरेशन ऑफ तमिळ संगम ऑफ नॉर्थ अमेरिकन’, या संघटनेनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.