Mahakumbh 2025 : पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज करणार यज्ञ

महाकुंभनगरीत चालू होणार शेकडो यज्ञ !

बांबूचा वापर करून बनवण्यात आलेली यज्ञशाळा

प्रयागराज, १२ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभनगरी प्रयागराज येथे १३ जानेवारीला कुंभस्नान आणि १४ जानेवारीला पहिले राजसी (शाही) स्नान असणार आहे. महकुंभमेळ्यात स्नानासह यज्ञ, साधना, अनुष्ठान यांचेही पुष्कळ महत्त्व असल्याने येथे आखाडावासी, संप्रदाय, संत यांनी शेकडो यज्ञांचे आयोजन केले आहे. सध्या संतांच्या मोठ्या तंबूंमध्ये प्रवचन, कथावाचन यांचे कायक्रम आरंभ झाले आहेत. १३ जानेवारीपासून यज्ञयागाला प्रारंभ होणार आहे.

महत्त्वाच्या यज्ञांमध्ये पंचायती निरंजनी आखाड्यातील बगलामुखी यज्ञ, तुलसी पिठाधिश्‍वर जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्या शिबिरातील यज्ञ, संत बालकदास महाराज, स्वामी महेशानंद गिरि, शंकरदेव चैतन्य ब्रह्मचारी इत्यादी करणार असलेले विविध यज्ञ यांचा समावेश आहे. बांबू आणि काठ्या यांचा उपयोग करून तात्पुरत्या स्वरूपाचे भव्य यज्ञमंडप बांधण्यात आले आहेत. हवनीय द्रव्यांची आहुती आणि मंत्रोच्चार यांमुळे कुंभक्षेत्राचे पवित्र वातावरण चैतन्याने भारीत होणार आहे. भाविकांना कुंभक्षेत्री या भव्य यज्ञांचा आध्यात्मिक लाभ मिळवता येणार आहे. या यज्ञांमुळे आध्यात्मिक लाभासह वातावरणाचीही शुद्धी होणार आहे.

पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी यज्ञ

जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज

पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज २५१ यज्ञकुंडांमध्ये ३०० आचार्यांच्या माध्यमातून आहुती देणार आहेत. या वेळी ते पाकव्याप्त काश्मीर लवकर मुक्त होण्यासाठी संकल्प करून प्रार्थना करण्यात येणार आहेत. १३ फेब्रुवारीपर्यंत हा यज्ञ चालू असणार आहे.

बगलामुखी महायज्ञ

१३ जानेवारीला पहाटे ५.३० वाजता ‘मा बगलामुखी महायज्ञा’ची पूजा श्री पंचायती श्री निरंजनी आखाडा येथे होईल. हा महायज्ञ १ सहस्र ८ घंटे चालणार आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत हा यज्ञ चालेल.

सैन्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यज्ञ

महाकुंभामध्ये पहिल्यांदाच सैन्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महायज्ञाचे आयोजन होत आहे. ‘अती विष्णु महायज्ञ सेवा समिती’कडून संत रामबालकदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ होईल. या यज्ञासाठी १०८ यज्ञकुंडे सिद्ध केली आहेत. यज्ञ समितीकडून सैन्याच्या ७०० कुटुंबांना यज्ञाला येण्यासाठी निमंत्रण दिले आहे. हरिश्‍चंद्र मार्गावर या यज्ञाचे आयोजन केले आहे.

गोरक्षणासाठी यज्ञ

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्या मंडपात गोरक्षणासाठी ३२४ कुंडांची यज्ञशाळा उभारण्यात आली असून ही महाकुंभातील सर्वांत मोठी यज्ञशाळा आहे. यज्ञशाळेत मध्यभागी ९ मजली बांबू आणि काठ्या यांची रचना केली असून नवदुर्गांशी संबंधित आहे.

१११ कुंडीय अतीरुद्र महायज्ञ

स्वामी महेशानंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली १५१ आचार्य १११ कुंडीय अतीरुद्र महायज्ञ २१ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत करतील. सोमेश्‍वर धाम नवचंडी आश्रमाच्या मंडपात हे आयोजन केले आहे.

विश्‍वकल्याणासाठी महायज्ञ

१४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत १०८ कुंडांच्या यज्ञात १ सहस्र १०० आचार्य विश्‍वशांतीसाठी आहुती देतील. श्री राम लोचन स्वरूप ब्रह्मचारी बाबा लिलौटीनाथ यांच्या मंडपात हे आयोजन केले आहे.