युगपुरुष निर्मात्या राजमाता जिजाऊ !

आज राजमाता जिजाऊ यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…

राजमाता जिजाऊ

‘लखुजी जाधव यांची ८ वर्षांची जिजा एकदा आपल्या गडाच्या पायथ्याशी देवदर्शनासाठी मंदिरात गेली होती. मंदिराच्या कट्ट्यावर बसलेला एक मोगल सैनिक फळे खाऊन त्याचे उष्टे मंदिरात फेकत होता. जिजाने ते पाहून त्याला टोकले; परंतु त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. जिजाने गडावर जाऊन वडिलांना ही गोष्ट सांगितली; परंतु लखुजी मोगल सैनिकाला रोखण्याच्या भानगडीत पडले नाही. त्याच वेळी बाल जिजाने प्रतिज्ञा केली, ‘ती ही परिस्थिती पालट केल्याविना स्वस्थ बसणार नाही.’ एके दिवशी भोसलेंच्या सुनेला नाशिकच्या पंचवटीमध्ये स्नान करतांना मोगल सैनिक महबत खानाने उचलून गेले. जिजासाठी ही घटना लहानपणीच्या त्या प्रतिज्ञेला पुष्टी देणारी ठरली. तिने आपल्या पतीला ही परिस्थिती पालटण्यासाठी सांगितले; परंतु पती शहाजी भोसलेसुद्धा इच्छा असूनही सोडवू शकले नाहीत; परंतु जिजाने आपली प्रतिज्ञा सोडली नाही. तिने शिवाईदेवीकडे ‘राष्ट्र-धर्माचे रक्षण करणारा पुत्र पोटी द्यावा’, असे मागणे मागितले.

१. बाल शिवाजीवर योग्य संस्कार करणे !

फाल्गुन कृष्ण ३ विक्रम् संवत् १६८४ या दिवशी जिजाबाईने शिवनेरीच्या किल्ल्यावर बाल शिवाजीला जन्म दिला. जिजामाता यांचे समर्थ हात बाल शिवाजीला घडवू लागले. एकदा एक गीतकार जिजामाता यांना राणी पद्मिनीच्या वीरगाथेचे गीत ऐकवत होता. त्या वेळी अकस्मात् बाल शिवाजी उठून जाऊ लागले. राजमाता जिजाऊंनी त्यांना  विचारल्यावर ते म्हणाले, ‘मी हे दुःखद हृदयद्रावक गीत ऐकू शकत नाही.’ त्यावर जिजामातेने म्हटले, ‘तू हे गीत ऐकायला घाबरतोस. येथे तर यापेक्षाही भयंकर घटना घडत आहेत. तू प्रतिज्ञा घे की, तुला ही परिस्थिती पालटायची आहे.’

२. जिजामाता यांनी छत्रपती शिवरायांना कोंडाणा गड जिंकण्याविषयी सांगणे

एकदा जिजामाता आणि छत्रपती शिवाजी हे दोघे सारीपाट खेळत होते. तेव्हा छत्रपती शिवराय यांनी विचारले, ‘डावाला काय लावू ?’ जिजामातांनी म्हटले, ‘माझा विजय झाला, तर समोरच्या कोंडाणा गडावर जो हिरवा ध्वज फडकत आहे, त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवायचा.’ जिजामाता यांचा विजय झाल्यावर छत्रपती शिवरायांचे सरदार तानाजी यांनी स्वतःच्या मुलाचा विवाह सोडून कोंडाणा गड जिंकून आणला. कोंडाणा गडावरील अटीतटीच्या युद्धात सरदार तानाजी यांना वीरगती प्राप्त झाली. त्या वेळी छत्रपती शिवराय यांनी म्हटले, ‘गड आला; पण सिंह गेला !’

३. घरोघरी राष्ट्रीयतेच्या विजयाचा निनाद घुमला !

जिजामातेने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी लोकांमध्ये वैचारिक दृढता आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी पुष्कळ कवींना समर प्रसंगांवर काव्य (पोवाडे) रचण्याचा आदेश दिला. त्यामुळे लवकरच हे पोवाडे घरोघरी हिंदुत्वाच्या विजयाच्या निनादरूपात गुंजू लागले. लोकांमधील सुप्त मनात नवचेतना जागृत झाली आणि लोक  स्वराज्य आणण्यासाठी प्रयत्नरत होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना साथ देऊ लागले.

४. शुद्धीकरणाच्या माध्यमातून परधर्मियांचे धर्मांतराचे आक्रमण परतवणे

जिजामाता जाणून होत्या, ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर !’ छत्रपती शिवराय यांनी धर्मांतर झालेल्या मूळचे हिंदु असलेल्या मुसलमानांशी स्वतः बोलणी केली आणि त्यांना पुन्हा हिंदु धर्म स्वीकारण्यास सिद्ध केले. जिजामाता यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे विधीवत् शुद्धीकरण झाले आणि त्यांना सामाजिक मान्यता मिळाली. त्यानंतर शुद्धीकरणाची मालिका अविरत चालूच राहिली. या माध्यमातून मुसलमान सत्ताधिशांद्वारे होणार्‍या धार्मिक आक्रमणावर त्यांनी कठोर प्रहार केला.

५. अखेरीस स्वप्न साकार झाले !

राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी त्यासाठी सतत ३२ वर्षे अहर्निश प्रयत्न केले. अगणित लोकांना जिजामाता यांच्या वात्सल्याचा प्रसाद मिळाला. आपल्या पदरात छत्रपती शिवाजीच्या रूपात प्रज्वलित केलेली स्वराज्याची ज्योत त्यांनी विझू दिली नाही आणि स्वतःचा पदरही जळू दिला नाही. उलट त्या ज्योतीचे महाज्योतीत रूपांतर केले. छत्रपती शिवराय यांनी स्वतःची वीरता, योजकता, नेतृत्व आणि कूटनीती यांच्या बळावर हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. वर्ष १६७४ मध्ये छत्रपती शिवरायांचा विधीवत् राज्याभिषेक झाला. जिजामातेचा तो पुत्र धर्मरक्षक, प्रजापालक छत्रपती सम्राटाच्या रूपात देशभरात मान्यता पावू लागला. राज्याभिषेकानंतर

११ दिवसांतच जिजामाता यांनी संकल्पपूर्ती झाल्याच्या समाधानासह महाप्रयाण केले.

–  विजयसिंह माली, पाली, राजस्थान.

(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, वर्ष १२)