आज सुनावली जाणार शिक्षा
कासगंज (उत्तरप्रदेश) – येथील चंदन गुप्ता हत्याकांडात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने २८ आरोपींना दोषी ठरवले आहे. २ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २ जानेवारी या दिवशी लक्ष्मणपुरी येथील न्यायालयात ही सुनावणी झाली. या २८ आरोपींना उद्या, ३ जानेवारी या दिवशी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. चंदन गुप्ता यांची २६ जानेवारी २०१८ या दिवशी तिरंगा यात्रेत सहभागी असतांना धर्मांध मुसलमानांनी हत्या केली होती. या प्रकरणी आसिफ कुरेशी उपाख्य हिटलर, अस्लम, असीम, शबाब, साकिब, मुनाजीर रफी, आमिर रफी, सलीम, वसीम, नसीम, बबलू, अक्रम, तौफिक, मोहसिन, राहत, सलमान, आसिफ जिमवाला, निशू, वासीफ, इम्रान, शमशाद, जफर, शाकीर, खालिद परवेझ, फैजान, इम्रान, शाकीर, जाहिद उपाख्य जग्गा यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
२६ जानेवारी २०१८ या दिवशी प्रजासत्ताकदिनी चंदन गुप्ता इतर तरुणांसमवेत कासगंजमध्ये दुचाकी फेरी काढत होते. ही फेरी तिरंगा झेंडे घेऊन काढण्यात आली. ही फेरी मुलींच्या शासकीय आंतर महाविद्यालयाजवळ आली असता मुसलमान तरुणांनी फेरीवर आक्रमण केले. त्यांनी गोळीबार आणि दगडफेक केली. चंदन गुप्ता यांना लक्ष्य करून गोळ्या घातल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर कासगंजमध्ये प्रचंड हिंसाचार झाला.
चंदन गुप्ता यांच्या कुटुंबियांच्या तोंडाला पुसण्यात आली पाने !
चंदन गुप्ता यांचे वडील सुशील गुप्ता यांनी सांगितले की,
१. चंदनच्या हत्येनंतर माझ्या कुटुंबाला जवळपास १ वर्ष पोलीस संरक्षण मिळाले. नंतर ते काढण्यात आले. माझा मोठा मुलगा विवेक गुप्ता या खटल्यात साक्षीदार आहे. पूर्वी वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करायचो; पण आता भीतीपोटी मी नोकरी गमावली आहे. आम्हाला अनेकदा धमक्याही आल्या आहेत. आता घरखर्चाचे संपूर्ण दायित्व माझ्यावर आहे. मुलीच्या विवाहाचेही दायित्व आहे.
२. चंदनच्या हत्येतील २९ आरोपींपैकी २८ कारागृहाच्या बाहेर आले आहेत. या सर्वांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. आरोपी आर्थिकदृष्ट्या भक्कम आहेत. त्यामुळे ते खटला लढण्यास सक्षम आहेत.
३. जेव्हा कासगंज न्यायालयात सुनावणी होती, तेव्हा आमच्या बाजूने ३-४ लोक असायचे, तर १००-२०० लोक आरोपीच्या बाजूने जमायचे. दबाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळे आम्ही स्वतःच्या पैशाने उच्च न्यायालयात खटला लढवला आणि खटला लक्ष्मणपुरी येथे वर्ग केला. आता आम्ही सुनावणीसाठी सुरक्षेविना लक्ष्मणपुरीला जातो.
४. चंदन हत्याकांडात ६ हून अधिक साक्षीदार होते; मात्र आता काही जण वगळता इतरांनी साक्ष देण्यापासून माघार घेतली आहे. आता माझाच मुलगा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहिला आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्या सुरक्षिततेची चिंता आहे.
५. चंदनच्या निधनानंतर अनेक आश्वासने देण्यात आली. ‘माझ्या मुलीला सरकारी नोकरी आणि शहरातील एका चौकाला चंदनचे नाव देऊ’, असे सांगण्यात आले. माझ्या मुलीने एम्.एस्सी. पूर्ण केले आहे. तिला स्थानिक नोकरी देण्यात आली जी ५ महिन्यांनंतर संपुष्टात आली. हत्येनंतर सरकारने आम्हाला २० लाख रुपयांचे साहाय्य केले होते; ती रक्कम केवळ या खटला चालवण्यासाठी वापरली जात आहे.
६. हे प्रकरण संपवण्यासाठी दबाव आणण्यासाठी ज्या लोकांना पाठवले जात आहे, ते हिंदू आहेत. ते माझ्याकडे सर्व प्रकारचे प्रस्ताव आणि प्रलोभने घेऊन येतात. माझा मुलगा जिवंत राहिलेला नाही. मीही मरायला सिद्ध आहे; पण दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन.
संपादकीय भूमिका७ वर्षांनंतर न्याय मिळणे हा एक प्रकारे अन्यायच होय ! |