पुणे शहराची मानहानी !

देशभरात सध्या जागोजागी काही ना काही कारणाने मेजवान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बर्‍याच ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करण्यात येते आणि अनेक ठिकाणी तरुण-तरुणी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले जात असल्याचे आढळून आले आहे. ही गोष्ट आता इतकी सामान्य झाली आहे की, या मेजवान्यांचे आयोजन करणार्‍या पबवाल्यांकडूनच तरुण पिढीला ‘कंडोम’ आणि शक्तीवर्धक असे ‘ओ.आर्.एस्.’चे पाकीट दिले जात आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील ‘हाय स्पिरीट’ पबने हा प्रकार चालू केला आहे. ‘तरुणांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये २ वस्तू देत आहोत’, असे पबचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी पब व्यव्यस्थापकाकडून याची माहिती घेत चौकशी चालू केली असून मेजवानीसाठी येणार्‍या लोकांचे जबाबसुद्धा नोंदवले आहेत.

असा प्रकार पुण्यासारख्या शहरात होतो, हे पुण्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे. अतिशय निंदनीय आणि लाजिरवाणे असे हे कृत्य आहे. कोणे एकेकाळी पुणे शहराला मान-सन्मान होता; पण ‘दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या अनैतिकतेने त्याला पूर्णपणे नष्ट केले आहे आणि पुणे शहराची अब्रूच वेशीवर टांगली आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ही सर्व स्थिती पहाता ‘कुठे नेऊन ठेवले आहे पुणे ?’, असे म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आज येत आहे. अशा गैरकृत्यांमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोचण्याचीही भीती असून समाजात चुकीच्या सवयी रुजल्या जाण्याचा धोका आहे. सजग आणि जागरूक पुणेकरांनी अशा प्रकारांच्या विरोधात आवाज उठवायला हवा. आज पुण्यात जे घडले, ते राज्यात आणि देशात घडण्यास वेळ लागणार नाही.

खरेतर वाढत्या वासनांधतेमुळे महिलांवरील अत्याचारांत वाढ झालेली असतांना त्यावर नियंत्रण मिळवणे तर दूरच, उलट तरुणांना असे साहित्य पुरवणे, म्हणजे गैरर्वतणुकीला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. सध्या तरुणांमध्ये संयम निर्माण करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्याविषयी काहीही सुवेरसुतक नसणार्‍या आणि तरुण पिढीला पर्यायाने देशाला विनाशाच्या गर्तेत लोटणार्‍या अशा पबवर वेळीच बंदीच घालायला हवी. मध्यंतरी नवरात्रोत्सवातही कंडोमची पाकिटे वितरित केली जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आताचे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यादृष्टीने समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांनी याकडे पहायला हवे. पालकांनीही मौजमजेच्या नावावर आपल्या मुलांना अमली पदार्थ, कंडोम यांच्या आहारी जाऊ न देता त्यांच्यावर योग्य ते संस्कार करायला हवेत. भारताची मानहानी करणार्‍या अशा गोष्टी टाळणे, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाचे कर्तव्य आहे !

– सौ. भक्ती भिसे, पनवेल