भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दावा
बीड – भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एका मोठ्या घोटाळ्याचा खुलासा केला आहे. बीडच्या टेंभूर्णी गावातील एकाच व्यक्तीच्या नावावर ९ अब्ज रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा सुरेश धस यांनी २७ डिसेंबर या दिवशी केला. बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी धनंजय मुंडेंसह वाल्किम कराडवर नाव न घेता टीका केली.
एकाच व्यक्तीच्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात, याचे संबंधित यंत्रणांनी अन्वेषण केले पाहिजे. मी पोलीस अधीक्षकांना सांगितले की, ‘महादेव ॲप’च्या माध्यमातून हा घोटाळा झाला आहे. याची लिंक थेट मलेशियापर्यंत आहे. बीडमधून चांगल्या अधिकार्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या मर्जीतील अधिकार्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा दावा धस यांनी केला आहे. (या आरोपांविषयी अन्वेषण करून सत्य जनतेसमोर आणावे ! – संपादक)
भूमी बळकावण्याचा ‘परळी पॅटर्न’ !
परळीजवळ शिरसाळा गावात गायरान भूमी कह्यात घेऊन गाळे बांधले आहेत. शिरसाळ्यातील ६०० वीटभट्ट्यांपैकी ३०० अवैध आहेत. गायरान भूमीवर बंजारा आणि पारधी समाजातील लोकांची घरे होती. पोलीस लावून त्यांना हाकलून लावले आणि गायरान भूमी कह्यात घेतली. कुठे १०० एकर, कुठे १५० एकर अशा कोट्यवधी रुपयांच्या भूमी ‘आका’च्या नावावर आहेत. हा पैसा कुठून आणला ? गायरान भूमीवर कब्जा करायचा, हाच ‘परळी पॅटर्न’ आहे. परळीमध्ये तर राखेचे माफिया मोठ्या प्रमाणात आहेत. याद्वारे कोट्यवधींची उलाढाल होते, असा आरोपही सुरेश धस यांनी या वेळी केला.