|
पणजी, २८ डिसेंबर (वार्ता.) – १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत राज्यात एकूण २ सहस्र ४३७ अपघातांची नोंद झाली आहे, तर यामध्ये २५८ जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा मद्यप्राशन करून वाहन चालवल्याची ५ सहस्रांहून अधिक प्रकरणे नोंद झालेली आहेत आणि मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या घटना वाढल्याने अपघातांची संख्या वाढली आहे, अशी माहिती गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे.
१ जानेवारी ते ७ डिसेंबर या कालावधीत दक्षिण गोव्यात मद्यप्राशन करून वाहन चालवल्याची २ सहस्र ५८५ प्रकरणे, तर याच कालावधीत उत्तर गोव्यात २ सहस्र ४२३ प्रकरणांची नोंद झाली आहे. दक्षिण गोव्यात सर्वाधिक वास्को पोलीस ठाण्यात ६२५, त्यापाठोपाठ फोंडा ३५८ आणि काणकोण येथे २८१ प्रकरणे नोंद झाली आहेत. उत्तर गोव्यात सर्वाधिक कळंगुट येथे ४३६, त्यापाठोपाठ म्हापसा ४१४ आणि पेडणे येथे ३६७ प्रकरणे नोंद झालेली आहेत. गतवर्षी मद्यप्राशन करून वाहन हाकल्याची राज्यात एकूण १ सहस्र ८२९ प्रकरणे नोंद झाली होती. विशेष म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणार्या चालकांना पहिल्या गुन्ह्यासाठी १० सहस्र रुपये दंड आहे आणि ही चूक त्याने पुन्हा केली, तर ६ महिन्यांची कारागृहाची शिक्षा आहे. तरीही या प्रकारांना आळा बसलेला नाही.
अपघातांची मालिका चालूच, जुन्या मांडवी पुलावर अपघात
पणजी – पर्वरी येथील मालीम सर्कलजवळील जुन्या मांडवी पुलावर झालेल्या एका अपघातात ‘रेंट-अ-कार’ने (वाहन चालवण्यासाठी भाडेपट्टीवर देणे) ३ दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली आणि यामध्ये तिघे गंभीररित्या घायाळ झाले आहेत. २८ डिसेंबर या दिवशी पहाटे ५.४५ वाजता ही घटना घडली. अपघातानंतर घायाळ झालेल्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पर्वरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.