सातारा येथे ५ लाख रुपयांच्‍या लाचेच्‍या प्रकरणी न्‍यायाधीशांसह चौघांविरुद्ध तक्रार !

सातारा, १२ डिसेंबर (वार्ता.) – सातारा जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयात जामीन संमत करून देण्‍यासाठी ५ लाख रुपयांची मागणी न्‍यायाधीशाने केली. ही लाच मिळवण्‍यासाठी न्‍यायाधीशांसह चौघांनी प्रयत्न केले आहेत. तक्रारदाराच्‍या तक्रारीनंतर न्‍यायाधीशांसह चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. (आता न्‍यायाधीशही लाच मागतात, मग लोकांनी न्‍यायासाठी जायचे कुणाकडे ? – संपादक)

पुणे येथील तरुणीचे वडील जिल्‍हा कारागृहात आहेत. त्‍यांच्‍या वडिलांचा जिल्‍हा सत्र न्‍यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी संशयित आरोपी आनंद खरात, किशोर खरात यांनी जिल्‍हा सत्र न्‍यायाधीश (वर्ग-३) धनंजय निकम यांच्‍याशी संगनमत केले. तक्रारदार तरुणीच्‍या वडिलांचा जामीन करून देण्‍यासाठी न्‍यायाधीश निकम यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली. जामिनाविषयी सांकेतिक भाषेमध्‍ये चर्चा करण्‍यात आली, तसेच १० डिसेंबर या दिवशी संशयित आरोपी आणि त्‍यांच्‍यासोबत अनोळखी व्‍यक्‍तीने तक्रारदार तरुणीकडे ५ लाख रुपये स्‍वीकारण्‍याची सिद्धता दर्शवली. तरुणीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. विभागाने सापळा रचला. संशयित आरोपींनी पैसे गाडीत आणून देण्‍यासाठी तक्रारदार यांना सांगितले. ही रक्‍कम स्‍वीकारतांना विभागाने आरोपींना रंगेहात पकडले.