बेळगाव येथे मराठी भाषिकांच्‍या मेळाव्‍यास अनुमती न दिल्‍यास ठाकरे गट आक्रमक !

प्रतीकात्मक छायाचित्र

कोल्‍हापूर, ११ डिसेंबर (वार्ता.) – कर्नाटक शासनाने महाराष्‍ट्र एकीकरण समितीच्‍या मेळाव्‍यास अनुमती नाकारली आणि मराठी भाषिकांना अटक केली. याचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्‍हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांसह अन्‍य पदाधिकारी आक्रमक झाले. कोल्‍हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन बाहेर पडणारे भाजपचे आमदार, माजी मंत्री यांना अडवून त्‍यांनी या प्रकरणाची माहिती दिली. मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्‍यायाला कर्नाटकचे आमदार, मंत्री यांनी वाचा फोडावी, अशी मागणी त्‍यांनी या प्रसंगी केली.

या प्रसंगी विजय देवणे प्रसिद्धी माध्‍यमांशी बोलतांना म्‍हणाले, ‘‘कर्नाटक सरकारला वारंवार विनंती करून मराठी भाषिकांचा महामेळावा होऊ दिला नाही. या मेळाव्‍यासाठी जाणार्‍या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कर्नाटक पोलिसांनी बेळगाव जिल्‍ह्यात प्रवेश करू दिला नाही. असे करून ते मराठी भाषिकांची गळचेपी करत आहेत. त्‍यामुळे कर्नाटकचे पोलीस आम्‍हाला अडवतील, तर कर्नाटकचे लोकप्रतिनिधी, मंत्री यांना आम्‍ही महाराष्‍ट्रात फिरू देणार नाही, अशी चेतावणी दिली आहे. या लोकप्रतिनिधींना आम्‍ही बेळगाव येथे विधानसभेचे अधिवेशन चालू असून तुम्‍ही आमच्‍या भावना तेथे मांडा, अशी विनंती केली आहे.’’