देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला हरिद्वार (उत्तराखंड) येथील श्री पंचदश नाम जुना आखाड्याचे मंडल श्री महंत ओम गिरीजी महाराज यांची भेट !
देवद (पनवेल), ६ डिसेंबर (वार्ता.) – भारतभूमी पावनभूमी आहे. परमात्माच आपल्याला सर्व काही देत आहे. त्याच परमात्म्याने आपल्याला या पवित्र भूमीवर पाठवले आहे. भारतवर्षाला प्रकाशमान करण्यासाठी आश्रमात अनेक दीपांची (साधकांची) निर्मिती होत आहे. आपल्यावर भगवंताची कृपा आहे. हिंदुत्वाला चेतवण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत, असे मार्गदर्शन हरिद्वार येथील जुना आखाड्याचे मंडल श्री महंत ओम गिरीजी महाराज यांनी केले. त्यांनी येथील सनातनच्या आश्रमाला ६ डिसेंबर या दिवशी भेट दिली. या वेळी त्यांच्या झालेल्या सन्मानप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी आश्रमात चालणार्या सेवा, तसेच सनातन संस्थेचे कार्य यांविषयी आश्रमातील साधक श्री. राजेंद्र दिवेकर यांनी त्यांना अवगत केले. आश्रमातील सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. नंतर सनातनचे पू. शिवाजी वटकर यांनी त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. महाराजांना सनातनचे राष्ट्र-धर्माशी निगडीत हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देण्यात आले.
क्षणचित्र : सन्मानानंतर ते सर्व साधकांकडे पाहून म्हणाले, ‘‘तुम्ही सर्वजण नारायणच आहात आणि ‘मी नारायणाचेच दर्शन घेत आहे’, असे वाटते.’’
वैशिष्ट्यपूर्ण !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विश्वव्यापी कार्य जाणून घेतल्यावर त्यांनी त्यांचे कौतुक केले. ‘आश्रमात आल्यावर मला धन्य धन्य वाटले’, असे उद़्गार त्यांनी काढले. साधकांचा नम्रभाव आणि सेवाभाव पाहून त्यांना कौतुक वाटले. ‘सनातन संस्थेची स्थापना होणे ही काळाची आवश्यकता आहे’, असेही ते म्हणाले.
२. या वेळी त्यांच्या समवेत आलेले ब्रह्मानंदगिरी म्हणाले, ‘‘आजचा दिवस आमच्यासाठी भाग्यवान दिवस आहे. आज आम्हाला सनातन आश्रमाला भेट देण्याची संधी मिळाली !’’
३. मंडल श्री महंत ओम गिरीजी महाराज हे कुंभमेळ्याला जाण्याआधी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी निघाले होते. प्रवासात पनवेल येथे आल्यावर त्यांना संकेत आला की, येथे एखादा आश्रम असेल ! त्यांच्या सहकार्यांनी याविषयी ‘गूगल’वर शोधल्यावर त्यांना ‘सनातन आश्रमा’विषयी समजले. त्याच्या शोधात ते आश्रमापर्यंत आले आणि सर्व साधकांना त्यांचा सत्संग मिळाला !