बांगलादेशातील इस्कॉनचे सदस्य आणि हिंदु नेते चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना बांगलादेशात ‘आतंकवादी’ ठरवत अटक करण्यात आली आहे. ही गोष्ट समस्त हिंदु समाजाच्या मनात चीड आणणारी आहे. त्यांनी म्हणे देशद्रोह केला आहे. देशातील शांतता भंग केल्याचा, धार्मिक सलोखा बिघडवल्याचा, तसेच बांगलादेशी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बांगलादेशातील हिंदूंचे नेतृत्व चिरडण्यासाठी तेथील सरकार कोणत्या थराला जाऊ शकते, हे चिन्मय कृष्ण दास प्रभु यांच्यावर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांवरून दिसून येते. ‘बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय आणि अत्याचार यांच्या विरोधात संघटितपणे आवाज उठवल्यास तेथील सरकारला हिंदूंवरील अत्याचारांची नोंद घ्यावी लागेल’, असा विश्वास चिन्मय कृष्ण दास प्रभु यांनी तेथील हिंदूंच्या मनात निर्माण केला. हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांनंतर त्यांनी बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये आंदोलने आयोजित केली. काही दिवसांपूर्वी बांगलादेशातील रंगपूर येथे लाखो हिंदू निषेध करण्यासाठी जमा झाले होते. चिन्मय कृष्ण दास प्रभु आणि त्यांच्यासारखे असंख्य प्रखर हिंदुत्वनिष्ठ यांनी तेथील हिंदूंना संघटित करण्यासाठी केलेल्या परिश्रमांचा परिणाम हा होता. तेथील कट्टरतावादी आणि जिहादी यांच्या हातून सतत मार खाणार्या, दहशतीच्या छायेत जगणार्या हिंदूंनी रंगपूर येथे कोणतीही भीडभाड न ठेवता ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. रंगपूर येथील आंदोलनामुळे हिंदूंना नवीन दिशा दिली, तसेच संघटनामुळे तेथील हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. ‘यापुढे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सहन करणार नाही’, असा निर्धार तेथील हिंदूंनी केला. हिंदूंमध्ये दिसून आलेल्या या आत्मविश्वासामुळेच तेथील सरकार हादरले. बांगलादेशात कुठलेही सरकार आले, तरी तेथील हिंदूंच्या नरकयातना थांबत नाहीत. शेख हसीना पंतप्रधान असतांनाही तेथील हिंदूंवर आक्रमणे होत होती; मात्र त्यांचे सरकार उलथवल्यानंतर तेथील हिंदूंचा मोठ्या प्रमाणात वंशविच्छेद होणे चालू झाले. महंमद युनूस जे काही निर्णय घेत आहेत, त्यावरून त्यांचा हिंदुद्वेष स्पष्टपणे दिसून येतो. ‘बांगलादेशातील हिंदू जागृत झाले, तर त्यांच्यावर अन्याय करणे किंवा त्यांची गळचेपी करणे शक्य होणार नाही’, हे महंमद युनूस सरकार यांना लक्षात आले असावे. त्यामुळे चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना कारागृहात डांबण्यात आले आहे. ‘यामुळे तेथील हिंदू नेतृत्वहीन होऊन दिशाहीन बनतील. अशाने ते हतबल होऊन त्यांना वाकवणे सोपे होईल’, असे बांगलादेशी सरकारचे षड्यंत्र यातून दिसून येते. चिन्मय कृष्ण दास प्रभु आणि त्यांचे सहकारी यांनी उभारलेल्या आंदोलनाचे भविष्य काय ?, हे येणारा काळच सांगेल.
चिन्मय कृष्ण दास प्रभु यांच्या अटकेनंतर इस्कॉनने ‘या प्रकरणी भारत सरकारने हस्तक्षेप करावा’, अशी मागणी केली आहे. मागील ४-५ महिने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारानंतर भारताने निषेध नोंदवण्याच्या पलीकडे काही विशेष कृती केलेली नाही. आताही भारताने ‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण करावे’, अशी बांगलादेश सरकारला विनंती केली आहे. हे लक्षात घेता तेथील हिंदूंसाठी हा कसोटीचा काळ आहे. चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना अटक झाल्यावर पुन्हा कुढत जगावे कि त्यांनी आंदोलनाद्वारे तेवलेल्या ज्योतीचे आगीत रूपांतर करावे, हे तेथील हिंदूंनी ठरवायचे आहे. हिंदू जी भूमिका घेणार, त्यावरून बांगलादेशातील हिंदूंचे भवितव्य ठरणार आहे. या स्थितीत हिंदू झुकले, तर पुढील काही वर्षांत हिंदू नामशेष होतील; मात्र या घटनेनंतर तेथील हिंदू पेटून उठले आणि तेथील आंदोलन सशक्त आणि बळकट केले, तर बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीत मोठा पालट होईल. बांगलादेशी हिंदूंचे भवितव्य त्यांच्याच हातात आहे !