|
वॉशिंग्टन : अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प हे २० जानेवारी २०२५ या दिवशी राष्ट्राध्यक्षाचा पदभार स्वीकारणार आहेत. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकण्याच्या आधी एका प्रचारसभेत बोलतांना, आयात शुल्काच्या संदर्भात भारताकडून गैरवर्तणूक होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ‘अमेरिकेत होणार्या ७५ अब्ज डॉलर किमतीच्या भारतीय निर्यातीवर शुल्क लादणार’, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आता ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा, चीन या देशांवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घोषित केला आहे; पण या सूचीतून भारताला वगळले आहे.
१. ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे दायित्व स्वीकारल्यानंतर मी मेक्सिको आणि कॅनडा या देशांतून येणार्या सर्व वस्तूंवर २५ टक्के शुल्क आकारणार आहे.
२. ते पुढे म्हणाले की, चीन सरकार ‘फेंटॅनाइल’ या अमली पदार्थाच्या तस्करीवर जोपर्यंत निर्बंध घालत नाही, तोपर्यंत चिनी मालावर अतिरिक्त १० टक्के शुल्क लादणार्या आदेशावर मी स्वाक्षरी करीन.
३. भारताला ‘जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सेस’ (जी.एस्.पी.) प्रोग्रामच्या अंतर्गत देण्यात आलेली शुल्क मुक्त प्रवेशाची सवलत वर्ष २०१९ मध्ये काढून घेण्यात आली. या सवलतीचा भारत हा सर्वांत मोठा लाभार्थी होता. या योजनेच्या अंतर्गत अमेरिकेत कोणतेही शुल्क न आकारता अंदाजे ५७० कोटी डॉलर (४८ सहस्र कोटी रुपयांच्या) किमतीच्या निर्यातीला अनुमती देण्यात आली होती होती.