कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे दर्शन घडवते. कुंभपर्वाच्या निमित्ताने प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चारक्षेत्री प्रत्येकी १२ वर्षांनी भरणार्या यात्रेला हिंदु जीवनदर्शनात महत्त्वपूर्ण स्थान आहे; मात्र ज्या आखाड्यांची स्थापना भगवान श्रीमद्आद्यशंकराचार्यांनी केली, त्या परंपरेला दूषित करण्याचा एकही प्रयत्न आखाड्यांमधील लोक सोडत नाहीत. आधी किन्नर आखाडा, नंतर ट्रान्सजेंडर यहुदी महिलेला महंत बनवणे, त्यानंतर पंचायती आखाड्यात एका स्त्रीचे मुंडण करून तिचा पट्टाभिषेक करणे, आता तर सर्व सीमा ओलांडून स्त्रीला शंकराचार्य पदावर नेमून तिचा पट्टाभिषेक करणे आदी विकृत गोष्टी सध्या चालू आहेत. स्त्रियांसाठी शास्त्रांमध्ये कोणताही संन्यास विधी नाही. अशा परिस्थितीत ‘महिला शंकराचार्य’ नावाचा हा नवीन पाखंड वैदिक धर्मावर कठोर आघात आहे.
शास्त्र आणि परंपरांची मोडतोड करत अन् प्रयागराज महाकुंभाला कलंकित करत, धर्मद्रोह्यांचे असे अधर्म पाखंड समोर येत आहेत. यापासून सावध रहायला हवे. खोट्या जगद्गुरूंचेही पेव फुटले आहे. त्यापैकी खरे शंकराचार्य फक्त चारच आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त पाचवे कोणतेही पीठ नाही किंवा पाचवा कोणताही शंकराचार्य नाही. पाखंडी धूर्तांपासून वाचले पाहिजे. कोणतीही महिला शंकराचार्य पदावर राहू शकत नाही, असा नियम स्वतः आद्यशंकराचार्यांनी ठरवला आहे. द्वारका-शारदापीठ आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी धार्मिक परंपरांमधील महिलांच्या हस्तक्षेपावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला असून ‘महिला इतर क्षेत्रांप्रमाणे राजकारणात जाऊ शकतात; पण शंकराचार्यांसारख्या संस्थेच्या प्रतिनिधी होऊ शकत नाहीत’, असे म्हटले आहे.
अन्य धर्मियांच्या प्रथा, परंपरा यांमध्ये हस्तक्षेप करण्याचे धाडस केले जात नाही. हिंदु सहिष्णू असल्यामुळे केवळ हिंदूंच्या प्रथा पालटून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवहारात आपण ‘अभियंत्याने रुग्णाची शस्त्रक्रिया करावी’, असे कधी म्हणतो का ? मग धर्माच्या संदर्भातील निर्णय स्वतःच्या मनाने का पालटले जातात ? धर्मशास्त्रात पालट करण्यासाठीचे अधिकार शंकराचार्य, धर्माचार्य, महंत आणि संत यांना असतांना अशी कृती करणे, हे स्वतःला त्यांच्यापेक्षा शहाणे समजण्यासारखेच आहे. आपल्या प्राचीन सनातन धर्मात सांगितलेल्या गोष्टी मनुष्याच्या कल्याणासाठीच आहेत आणि त्यांचे पालन करण्यातच मानवाचे हित आहे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे