छायाचित्रे काढणारा एक माणूस श्रीमहाराजांच्या दर्शनास आला. तो म्हणाला, ‘घरी सर्व क्षेम आहे. सध्या काही दुःख नाही. मागणे एवढेच आहे की, यापुढे प्रपंचात कुठल्याही तर्हेचे दुःख येऊ नये.’ श्रीमहाराजांनी त्याला विचारले, ‘तुमच्याकडे एखादे गिर्हाईक आले, म्हणजे त्याला तुम्ही काय सांगता ?’ तो म्हणाला, ‘कोणत्या आकाराचे छायाचित्र काढायचे आहे ?, ते आधी विचारतो, म्हणजे छापील प्रती (कॉपीज) किती पाहिजेत ? ते विचारतो. ३ प्रतींची किमान किंमत सांगतो. एकच प्रत घेतली, तरी किंमत तेवढीच; कारण जुळवाजुळव, खटपट आणि व्यय तेवढाच लागतो.’ श्रीमहाराज म्हणाले, ‘म्हणजे तुम्ही दुसरी-तिसरी प्रत फुकट देता, असेच झाले ना ? आता एखाद्याने म्हटले की, मला पहिली प्रत नको, दुसरी आणि तिसरीच द्या, तर ते हास्यास्पद नाही का होणार ? त्याचप्रमाणे प्रपंचात दुःख नको, हे मागणे सयुक्तिक नाही. मागायचेच झाले, तर प्रारब्धानुसार जे काय दुःख यायचे असेल, ते येऊ दे; पण रामा, ते सोसण्याची शक्ती मला देऊन तुझा विसर पडू देऊ नकोस. एवढेच साधकाने मागणे उचित ठरेल.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ पुस्तकातून)