तेहरान (इराण) : गेल्या काही वर्षांपासून इराणच्या सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्याच्या निर्णयाला तेथील महिलांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. तेथील महिलांनी हिजाबच्या संदर्भातील कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. इराणकडून ही आंदोलने चिरडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला. आता यासंदर्भात इराण सरकारने अधिक कठोर भूमिका घेतली आहे. ज्या महिला हिजाब घालण्यास विरोध करतील, त्यांच्यासाठी देशभरात मानसोपचार रुग्णालये उघडण्याची योजना सरकारने आखली आहे. या रुग्णालयांना ‘हिजाब काढून टाकण्याचे उपचार केंद्र’ असे नाव दिले जाईल.
तेहरान मुख्यालयातील महिला आणि कुटुंब विभागाच्या प्रमुख मेहरी तालेबी दारेस्तानी यांनी इराणी माध्यमांना सांगितले की, इराण लवकरच ‘हिजाब काढून टाकण्याच्या उपचारांचे केंद्र’ चालू करणार आहे. येथे हिजाब कायद्याला विरोध करणार्या सर्व महिलांवर वैज्ञानिक पद्धतीने मानसोपचार केले जातील.
इराणचे मानवाधिकार अधिवक्ते हुसेन रायसी यांनी अशी रुग्णालये उघडण्याच्या कल्पनेवर टीका केली. ते म्हणाले की, हिजाब घालण्यास नकार देणार्या महिलांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये उघडणे इस्लामी किंवा इराणी कायद्यानुसार नाही. सरकारचा महिला आणि कुटुंब विभाग इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या थेट अधिकाराखाली काम करतो.