गुंडांची मजल ? 

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे उदात्तीकरण करणारे आणि त्याची छायाचित्रे असलेले टी-शर्ट अन् वस्तू यांची उघडपणे विक्री होत आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाकडून संबंधीत वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्‍या ‘इ-कॉमर्स’ संकेतस्थळांवर पोलिसांकडून गुन्हे नोंदवले आहेत. ‘फ्लिपकार्ट’, ‘अली एक्सप्रेस’, ‘टीशॉपर’ आणि ‘इट्से’ यांसारख्या अनेक इ-कॉमर्स संकेतस्थळांवरून ही विक्री करण्यात येत आहे. एवढी संकेतस्थळे यामध्ये सहभागी असणे, हे गंभीर आहे.

‘हे वृत्त ऐकल्यानंतर आपल्या देशात काय चालले आहे’, असे वाटते. गुंडांचे वा गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याची संधी न सोडणारे आपल्या देशात खुलेआम वावरतात, हे संतापजनक आणि चिंताजनक आहे. गुंडांच्या छायाचित्राच्या टी-शर्टचे वितरण, म्हणजे गुंडांची प्रसिद्धी करणे. याचाच अर्थ ‘गुंड जे करत आहेत, तसे इतरांनी करावे’, हाच संदेश तरुणांच्या मनावर बिंबवला जात आहे. यातून गुन्हेगारी जीवनशैलीचे उदात्तीकरण केले जात आहे. गुन्हेगारी जीवनशैलीचे उदात्तीकरण करणारा गट आपल्या देशात आहे आणि त्याला सहकार्य करणारेही आहेत. यातून नैतिक मूल्यांची किती मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे आणि यावर कुणाचा अंकुश नाही, हेच दर्शवते. हे पाहिल्यावर सामान्य जनतेला प्रशासन आणि सुरक्षाव्यवस्था काय करते ? असा प्रश्न पडतो.

इंग्रज गेल्यानंतरही सध्याची शिक्षणप्रणाली मेकॉलेप्रणित असल्यामुळे देशात निर्माण होणारी तरुण पिढीही संस्कारक्षम नाही. कुणी गुंडांचे उदात्तीकरण करण्यासाठी त्यांची छायाचित्रे असलेल्या टी-शर्टची विक्री करत आहे, तर त्याला विरोध करण्याऐवजी काही जण असे टी-शर्ट विकत घेत आहेत. येथे विक्री करणारे आणि विकत घेणारे दोघांनाही याचे काहीच वाटत नाही. आपण देशाच्या विरोधात कृती करणार्‍या गुंडांचे उदात्तीकरण करत आहोत आणि यातून आपणही एक प्रकारे मोठा गुन्हा करत आहोत, याची जाणीवही नाही, तसेच देशात अराजक माजवण्यासाठी एक गट काम करत आहे, हे देशासाठी धोकादायक आहे.

महाराष्ट्र सायबर विभाग समाजमाध्यमांसह डिजिटल माध्यमांची पडताळणी करतो. सामाजिक परिस्थितीवर विपरित परिणाम होईल, असे लिखाण सापडल्यास त्यावर तात्काळ कारवाई करतो. ‘सुरक्षित डिजिटल वातावरण राखण्यासाठी आणि सार्वजनिक शांततेला धोका पोचवणार्‍या सामुग्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कटीबद्ध आहे’, असेही विभागाकडून सांगण्यात येते. देशात जे चालले आहे, त्यातून महाराष्ट्र सायबर विभागाचे एवढेच दायित्व आहे का ? असे असेल, तर सायबर गुन्हेगारीवर आळा बसेल का ? हे असेच राहिले, तर मग गुंडांची मजल कुठपर्यंत जाईल, याचा विचारच न केलेला बरा !

– वैद्या (सुश्री) कु. माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.