मागच्या महिनाभरापासून गोवा गाजत आहे, ते नोकर्यांच्या निमित्ताने ! ‘पैसे द्या, नोकरी घ्या’, या ‘लेबल’खाली गोव्यातील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. एक-दोघांची अटक म्हणता म्हणता एक मोठा नोकरी घोटाळाच चव्हाट्यावर आला आहे. प्रकरणाच्या मुळाशी जाता जाता फसवणूक करणार्यांची मोठी साखळी दिवसागणिक पुढे येत आहे, ज्यातून समाजात मुरलेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर येत आहे. हे प्रकरण भ्रष्टाचाराचे असले, तरी ते म्हणावे तितके सोपे नाही; कारण या प्रकरणाचा खुलासाच फसवणूक करणार्या व्यक्तीच्या आत्महत्येनंतर होऊ लागला.
पूजा नाईक आणि श्रीधर सतरकर यांनी ‘सरकारी नोकरी देतो’, असे सांगून पैसे घेतले. सतरकर हा सरकारी कर्मचारी असल्याने लगेचच प्रशासनातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार पुढे आला. फसवणूक करणार्या पूजा नाईक या महिलेपासून चालू झालेल्या या प्रकरणात आतापर्यंत ६-७ जणांना अटक आणि अनेकांची चौकशी झाली आहे, ज्यात शासकीय कर्मचार्यांचा सहभाग पुढे आला आहे.
भ्रष्टाचाराची सवय
फसवणूक करणारे चौकशीअंती शिक्षा भोगतीलच; पण मुळात यात खरा दोष कुणाचा ? याचा विचार होणे नितांत आवश्यक आहे; कारण भ्रष्टाचार ही सवय झाली आहे. ‘वाहतुकीचा ‘सिग्नल’ पाळला नाही की, पोलिसाला पैसे दे’; ‘कामाचा कागद पुढे सरकत नाही, शासकीय कर्मचार्याला पैसे दे’; नोकरीसाठी पैसे, बढतीसाठी पैसे, सगळ्यासाठी पैसेच ! शाळेत मूल्यशिक्षणात शिकवली जाणारी नीतीमत्ता आता ‘मूल्यहीन’ झाली आहे; कारण भ्रष्टाचार हा सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे. नोकरी मिळण्यासाठी गुणवत्ता, शिक्षण आवश्यक आहे; पण आता तो भूतकाळ झाला आहे. ‘नोकरीसाठी आता पैसा लागतो’, हेच समीकरण झाले आहे. त्यामुळे देणारे कुठूनही आणून, उसनवारी करून पैसे देतात आणि त्यानंतर नोकरी मिळाली नाही, तर तक्रार करतात. त्यातही तक्रार करणारे स्वतःला ‘पीडित’ समजतात; पण ‘नोकरीसाठी पैसे देणे, हा भ्रष्टाचार आहे’, असे कुणालाच वाटत नाही, इतका भ्रष्टाचार मुरला आहे. या प्रकरणाचा आतापर्यंतचा आढावा घेतला, तर पैसे खाणारे आणि देणारे हे कुणी गुन्हेगार अथवा घोटाळेबाज नाहीत, केवळ सुखाच्या मोहापायी गुंतलेले ‘सामान्य’च आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. पैसे देणार्यांना भविष्यातील सुखाची आस आहे आणि घेणार्यांना वर्तमानातील सुखाची, एवढाच काय तो भेद आहे. सुखाची आस असणार्यांना ‘स्वत: भ्रष्टाचार करत आहोत’, हेच लक्षात येऊ नये, इतकी भ्रष्टाचाराची सवय झाली आहे.
सरकारी नोकरी मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा, शिक्षण, गुणवत्ता हे निकष केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार’, हेही वाक्य मागे पडून त्याची जागा ‘कॅश फॉर जॉब’ या ‘ट्रेंड’ने घेतली आहे. सरकारी नोकरीसाठी आटापिटा केला जातो, तो नोकरी मिळाल्यानंतर मिळणार्या सुविधांसाठी ! येथे खरी गोम आहे. सरकारी नोकरीचे ‘पॅकेज’ हे सरकारी सुखसुविधा, अल्प काम आणि निवृत्तीवेतन असे आहे. त्यामुळेच कर्ज काढूनही लाखो रुपये व्यय करण्याची लोकांची सिद्धता आहे. त्याच लाखो रुपयांत स्वतःचा व्यवसायही करता येऊ शकतो; पण तसे न करता ‘आरामात खायला मिळावे’; म्हणून उपद्व्याप केला जातो. येथे समाजाची कष्ट न करण्याची वृत्ती दिसून येते.
अशा नोकर्या कुणाला दिल्या ?
गोव्यात मागील निवडणुकीच्या वेळी नोकरभरती करण्यात आली होती. त्या वेळी स्वत:च्या मतदारसंघांतील लोकांना, कार्यकर्त्यांना अनेकांनी नोकर्या दिल्या. त्या वेळी या विरोधात आवाज उठवला गेला होता. नोकर्या देण्याचा प्रकार आधीपासून होत आहे का ? याचे अन्वेषण केले गेले पाहिजे. ज्या अर्थी नोकरी देण्यासाठी पैसा घेतला जातो आणि लोकही विश्वासाने लाखो रुपये देतात, त्या अर्थी ‘अशा प्रकारे’ कुणाला तरी नोकरी मिळालेली आहे, असे म्हणता येईल. पूजा नाईक, दीपश्री सावंत आणि आणखी काही नावे यांनी फसवणूक केल्याचे पुढे आले; म्हणून ‘पैसे देऊन नोकरी’ हा प्रकार पुढे आला, नाही तर आतापर्यंत हा प्रकार बिनबोभाट चालूच राहिला असता.
नोकरी घोटाळ्याची सर्व मोठी प्रकरणे म्हार्दाेळ, फोंडा, वास्को, काणकोण या तालुक्यांत घडली असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत मिळालेल्या २२ तक्रारींवरून १९ जणांना अटक केली आहे. आणखी किती जणांची फसवणूक झाली असेल ? हे ठाऊक नाही. पैसे देणार्यांनी एवढे पैसे आणले कुठून ? हेही चौकशीचे सूत्र असू शकते. या प्रकरणात ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. राजकीय लोकांचा यात सहभाग आहे कि नाही ? हे निराळे सूत्र; पण शासकीय व्यवस्थेसह सामाजिक व्यवस्थाही भ्रष्टाचाराच्या अधीन झाली आहे, हे चिंताजनक ! पैसे घेऊन नोकरी देणार्यांना किंवा तसे आवाहन करणार्यांना देशहिताचे काही पडलेले नाही. केवळ खोर्याने पैसा मिळवण्याच्या पद्धती वापरून आलिशान घरे, सोने, वाहने यांत ‘सुखी’ रहायचे, एवढेच त्यांचे ध्येय आहे. भ्रष्टाचार करण्यापेक्षा त्याच पैशात व्यवसाय करून देशाच्या विकासाला चालना द्यावेसे वाटणारे अल्प जण समाजात आढळून येतील, अशी आजची स्थिती आहे.
कारवाईची दिशा
हा घोटाळा गोव्यातील सत्ताधारी भाजपसाठी मोठे आव्हान ठरत असून पक्षाचे शासन आणि उत्तरदायित्व यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विरोधकांनी या संधीचा लाभ घेत सरकारी नोकरभरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे. ‘सरकारी नोकरी पैसे देऊन मिळत नाही. नोकरीसाठी पैसे उकळणार्यांपासून जनतेने सावध रहावे’, अशी सतर्कतेची चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे आणि त्यांनी फसवणूक केलेल्यांविषयी तक्रार करण्याचे आवाहनही केले आहे. ‘लोकप्रतिनिधी वा मंत्री यांच्या साहाय्याविना असे प्रकार घडूच शकत नाहीत’, असे आरोप जनतेतून होऊ लागले आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यापासून विद्यमान सरकारची सुटका नाही. त्यामुळेच गोवा सरकारने पंतप्रधान मोदी यांच्या ‘न खाऐंगे, न खाने देंगे ।’ या आश्वासनानुसार पावले उचलून या प्रकरणाची खोलात जाऊन गांभीर्याने चौकशी करावी आणि जे जे संबंधित असतील, त्या प्रत्येकावर कठोरातील कठोर कारवाई करावी. सरकार कारवाई करणार असले, तरी पैसे देणारे, घेणारे आणि फसवणारे त्यांचे पाप कुठे फेडतील ? हे देव जाणो. अंततः अधर्माचा नाश होतोच, हे भ्रष्टाचार्यांनी लक्षात घ्यायला हवे, तसेच ‘मी भ्रष्टाचार करत नाही ना ?’, हा विचार नागरिकांनी प्रत्येक आर्थिक व्यवहाराच्या वेळी करायला हवा.
‘नोकरीसाठी पैसे देणे, हा भ्रष्टाचार आहे’, याविषयी समाजात जागृती करण्याची वेळ यावी, हे दुर्दैवी ! |