Canada : कॅनडातील ब्रॅम्प्टन आणि मिसिसॉगा येथील प्रार्थनास्थळांबाहेर निदर्शन करण्यावर बंदी

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी यापुढे कॅनडातील ब्रॅम्प्टन आणि मिसिसॉगा शहरांतील हिंदूंच्या मंदिरांबाहेर गदारोळ करू शकणार नाहीत. तसेच खलिस्तानी झेंडे आणि तलवारी आणू शकणार नाहीत. याचे कारण ब्रॅम्प्टन आणि मिसिसॉगा शहरांच्या अधिकार्‍यांनी प्रार्थनास्थळांच्या बाहेर निदर्शनांवर बंदी घातली आहे. याअंतर्गत कुणालाही मंदिर, मशीद किंवा चर्च अशा धार्मिक स्थळांच्या बाहेर प्रदर्शन करता येणार नाही.

प्रार्थनास्थळांच्या १०० मीटर क्षेत्रात निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणार्‍यांना शहर प्रशासनाकडून मोठा दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी कायदाही करण्यात आला आहे. हा नियम अशा वेळी आला आहे, जेव्हा खलिस्तानी समर्थकांनी मंदिरांवर आक्रमण करण्याची धमकी दिली आहे.

मंदिरांवर आक्रमणाची शक्यता असल्याने मंदिरांतील अनेक कार्यक्रम रहितही करण्यात आले आहेत. साधारण १० दिवसांपूर्वी खलिस्तानी समर्थकांनी ब्रॅम्प्टन येथील हिंदु सभा मंदिरावर आक्रमण करून भाविकांना मारहाण केली होती. यात काही जण घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका

केवळ बंदी घालून थांबू नये, तर आतापर्यंत ज्यांनी हिंदु मंदिरांच्या बाहेर निदर्शने करत हाणामारी केली, त्या खलिस्तानी समर्थकांवर कठोर कारवाई केली पाहिजे !