मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वक्तव्य
मुंबई – धर्म तुमच्या घरात असला पाहिजे. तो घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आणू नये. राज्यात केवळ गणपति, दहीहंडी या हिंदूंच्या सणांवर निर्बंध का ? मशिदींवरील भोंग्यांचा लोकांना त्रास होतो, त्याकडे धर्म म्हणून बघू नका, असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ‘मुंबई तक’ या डिजिटल वाहिनीवरील मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. या वाहिनीचे संपादक साहिल जोशी यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.
या वेळी राज ठाकरे म्हणाले, ‘‘राजकीय नेते मागील कित्येक वर्षे घोषणापत्रातून तीच तीच आश्वासने देत आहेत. जे करणे शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही, अशा गोष्टीच पुन्हा सांगितल्या जात आहेत. सर्व फुकट देऊन ते टिकणारे आहे का ? २० वर्षांपूर्वी काँग्रेस सत्तेत असतांना मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता. त्यावेळेस सत्ताधार्यांनी आरक्षण का दिले नाही ? वर्ष २०१६ मध्येही मोर्चे निघाले; पण तेव्हाही आरक्षण दिले गेले नाही. एकनाथ शिंदे यांनीही आरक्षण दिल्याचे घोषित केले; पण आरक्षणाची मागणी करणार्यांना उपोषणाला का बसावे लागले ? मराठी आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याविषयी कुणी बोलत नाही. महाराष्ट्र राज्य औद्योगिकदृष्ट्या सगळ्यात मोठे राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला, तर फरक पडत नाही; पण इथे असलेल्या उद्योगांमध्ये मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्ये उभी रहातात, मग कोकण का उभा राहू शकत नाही ? मागील १७ वर्षे मुंबई-गोवा महामार्ग सिद्ध होत नाही आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. पक्षाचे नाव, चिन्ह घेऊन जाणे हे चुकीचेच आहे.
पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची. आता द्वेषाचे राजकारण चालू आहे. पक्ष पूर्वीही फुटायचे; पण आता पक्षच घेऊन जातात. या सगळ्या गोष्टींना भाजप उत्तरदायी आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अटलजी, अडवाणीजी यांपासून ते प्रमोद महाजन यांच्यापर्यंत अनेक नेत्यांशी माझे स्नेहसंबंध होते आणि आहेत. त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची आणि सोडवण्याची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे. सढळ हाताचा आहे. अशी माणसे राजकारणात हवीत.’’