Awami League party march thwarted :  बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या मोर्चाला सरकारचा विरोध

शेकडो कार्यकर्त्यांना अटक, तर काही जणांना मारहाण

अवामी लीग पक्षाकडून काढण्यात आला मोर्चा

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात १० नोव्हेंबरला शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाकडून काढण्यात येणार्‍या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे. ‘बंगबंधू अव्हेन्यू’वरील अवामी लीगच्या केंद्रीय कार्यालयासमोर ही घटना घडली. बांगलादेशातील अंतरिम सरकारने या मोर्चाला अनुमती नाकारली होती आणि ढाकामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य अन् पोलीस यांना रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरवले होते. अवामी लीगच्या युवा आघाडीच्या जुबो लीगच्या नेत्या नूर हुसेन यांची १० नोव्हेंबर १९८७ या दिवशी इर्शादविरोधी चळवळीच्या वेळी हत्या करण्यात आली होती. या दिनानिमित्त अवामी लीगने मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.

१. यावर्षी ५ ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर अवामी लीग पक्षाचे हे पहिले मोठे आंदोलन होते. पक्षाने सामाजिक माध्यमांत पोस्ट करून सामान्य लोकांना आणि कार्यकर्त्यांना आमंत्रित केले होते. ‘ज्यांचा वर्ष १९७१ च्या मुक्ती युद्धाच्या मूल्यांवर आणि लोकशाही तत्त्वांवर विश्‍वास आहे, त्या सर्वांनी झिरो पॉईंट येथील मोर्चात सहभागी व्हावे’, असे त्यात म्हटले होते.

२. लोकशाहीविरोधी शक्तींना हटवण्याची आणि बांगलादेश अवामी लीगच्या नेतृत्वाखाली लोकशाही राजवट पुन्हा स्थापन करण्याची मागणीही पक्षाने केली. अवामी लीगने मोर्चाची घोषणा केल्यानंतर लगेचच देशाच्या अंतरिम सरकारने ‘या मोर्चाला अनुमती देण्यात येणार नाही’, असे स्पष्ट केले.

३. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांचे माध्यम (प्रेस) सचिव शफीकुल आलम म्हणाले की, अवामी लीगचे सध्याचे स्वरूप ‘फॅसिस्ट’ (मूलतत्त्ववादी) आहे. अशा फॅसिस्ट पक्षाला बांगलादेशात आंदोलन करू दिले जाणार नाही.

४. या संदर्भात ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ने  सांगितले की, नूर हुसेन दिनानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राजधानी ढाका आणि देशभरात सीमा सुरक्षा दलाच्या १९१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

शेख हसीना यांच्या शेकडो समर्थकांना अटक

मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर ढाका येथे आवामी लीगचे कार्यकर्ते आणि समर्थक यांंच्यावर पोलिसांनी कारवाई केली. बांगलादेशाच्या सैन्याने निदर्शनांपूर्वी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. आंदोलनापूर्वी खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए-इस्लामी या पक्षांनी घोषित केले होते की, ते अवामी लीगला निदर्शने करू देणार नाहीत.

डॉनल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या समर्थनार्थ मिरवणूक काढणार्‍यांना अटक

ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ विजयी संचलन काढण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना अटक करण्यात आली. अटक केलेले लोक अवामी लीगशी संबंधित होते.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात अंतरिम सरकार लोकशाही नाही, तर हुकूमशाही राबवत आहे. याविरोधात जागतिक समुदाय गप्प आहे. यातून लक्षात येते की, बांगलादेशात अस्थिरता आणि अशांतता रहावी, अशीच त्यांनी इच्छा आहे !