श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात किरणोत्सवात पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना स्पर्श !

कोल्हापूर, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. हे सूर्यकिरण देवीच्या चरणांपर्यंत पोचले. हे किरण देवीच्या चरणांवरून पुढे जाऊन देवीच्या बाजूला असलेल्या सिंहांपर्यंत पोचून पुढे लुप्त झाले. अनेक भाविकांनी हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहिल्याचे समाधान व्यक्त केले. किरणोत्सव झाल्यानंतर देवीची कर्पूरारती, तसेच देवळात घंटानाद केला गेला.

दीपावलीची सुटी असल्याने भाविकांनी दर्शनासाठी, तसेच सोहळा पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांना हा सोहळा पहाता यावा, यासाठी पश्चिम महाराष्ट्र मंदिर समितीच्या वतीने भव्य ‘स्क्रीन’ची व्यवस्था करण्यात आली होती.