संपादकीय : ‘विकिपीडिया’चा साम्यवादी चेहरा !

प्रतीकात्मक छायाचित्र

माहितीच्या उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण स्रोत असणार्‍या ‘विकिपीडिया’ संकेतस्थळाला भारत सरकारने नुकतीच नोटीस पाठवली आहे. कारण काय, तर या संकेतस्थळाच्या संदर्भात अन्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या तक्रारी आणि संकेतस्थळाकडून करण्यात येणारा पक्षपातीपणा ! ‘एशियन न्यूज इंटरनॅशनल’चे (‘ए.एन्.आय.’चे) ‘विकिपीडिया’ संकेतस्थळावरील पृष्ठ (पेज) कुणीतरी संपादित केले आणि ‘हे सरकारचे प्रचाराचे साधन आहे’, असे लिहिले. ‘हे पृष्ठ चुकीच्या पद्धतीने संपादित करणार्‍यांची नावे घोषित करावीत’, असे देहली उच्च न्यायालयाने सांगूनही ‘विकिपीडिया’ने तसे करण्यास नकार दिला होता. याविषयीच्या सुनावणीच्या वेळी देहली उच्च न्यायालयाने ‘जर तुम्हाला भारत आवडत नसेल, तर तुम्ही येथील तुमचे काम बंद करा. आम्ही सरकारला तुमचे संकेतस्थळ ‘ब्लॉक’ करण्यास सांगू’, अशा शब्दांत ‘विकिपीडिया’ला फटकारले होते. ‘स्वतःला विश्वकोश म्हणू नये’, असेही उच्च न्यायालयाने सांगितले. भारतातील वृत्तसंस्था ‘ए.एन्.आय.’ने ‘विकिपीडिया’वर २ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला प्रविष्ट केला होता. ‘विकिपीडिया’च्या माहितीत तटस्थता नसल्याचा आरोपही उच्च न्यायालयाने केला; मात्र पुष्कळ महिने होऊनही अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती ‘विकिपीडिया’ने दिलेली नाही. मुक्त ज्ञानकोश म्हणून मिरवणार्‍या ‘विकिपीडिया’ला सत्य माहितीमध्ये फेरफार किंवा छेडछाड करण्याचा काय अधिकार ? भारतातील न्यायालयांच्या आदेशाला न जुमानणारे ‘विकिपीडिया’ सरकारच्या नोटिसीला कितपत दाद देईल, हा प्रश्नच आहे. धादांत खोटी माहिती देणार्‍या अशा संकेतस्थळाला भारतात पायघड्या कशासाठी ? यावर भारतात बंदीची कारवाई का होऊ नये ? ‘या प्रकरणी आता न्यायालयीन सुनावण्यांची वाट बघण्यापेक्षा खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करू पहाणार्‍या ‘विकिपीडिया’वर भारत सरकारने बंदी घालावी’, असे देशप्रेमी जनतेला वाटते.

अनेकदा खोटी माहिती देऊन भारतविरोधी मत निर्माण करण्याचा प्रयत्न ‘विकिपीडिया’कडून केला जातो. यातून ‘संकेतस्थळाने भारताचा अवमान करण्याचा ठेकाच घेतला आहे कि काय ?’, असे वाटते. ‘ज्ञानकोश’, ‘विश्वकोश’ अशा गोंडस नावांच्या आडून धूर्त आणि भारतद्वेषी षड्यंत्र रचले जात आहे; पण दुर्दैवाने हे भारतियांनाही कळत नाही. त्यामुळे अशा संकेतस्थळावर डोळे मिटून विश्वास ठेवण्याची घोडचूक केली जाते. ‘विकिपीडिया’वर गेल्यास सर्व माहिती एका ‘क्लिक’मधून सहजगत्या मिळू शकते. असे असतांना चुकीची माहिती देऊन भारताची प्रतिमा डागाळण्याचा होणारा प्रयत्न, म्हणजे दुधात जाणूनबुजून मिठाचा खडा टाकण्याचा केलेला प्रकार होय !

अरेरावी, उद्दामपणा आणि मनमानी कारभार !

‘विकिपीडिया’च्या संकेतस्थळावर वर्ष २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी माहिती देणार्‍या प्रकाशित झालेल्या पानात साम्यवादी विचारसरणीच्या काही संपादकांनी चुकीची माहिती घुसडली. यात गंभीर, म्हणजे सत्य माहिती काढून नकारात्मक प्रतिक्रिया त्यात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपादकांनी ‘इंडिया टुडे’च्या संकेतस्थळावरील चित्रपटाच्या सकारात्मक समीक्षणाचा संदर्भ काढून ती माहिती पुसली आणि ‘फिल्म कंपॅनियन’ या ‘विकिपीडिया’च्या दृष्टीने निषिद्ध असलेल्या संकेतस्थळाचा संदर्भ देऊन चित्रपटाच्या विरोधातील समीक्षण तेथे जोडले. हिंदूंचा झालेला नृशंस नरसंहार दडपवण्याच्या प्रयत्नांतून ‘विकिपीडिया’ला नेमके काय साध्य करायचे होते, हे न समजण्याइतके भारतीय काही दूधखुळे नाहीत, हे त्याने लक्षात ठेवावे. खरेतर एखाद्या माहितीजन्य संकेतस्थळाने डावे किंवा उजवे न होता तटस्थ रहाणे आवश्यक आहे; पण दुर्दैवाने ‘विकिपीडिया’च्या संदर्भात तसे होतांना आढळत नाही. अरेरावी, उद्दामपणा आणि मनमानी करणे, हे तर जणू त्याच्या अंगीभूतच आहे. सत्याच्या ऐवजी असत्याच्या पायावर उभे असणारे हे संकेतस्थळ विश्वाला नेमकी कशी दिशा दाखवत असेल, याचा प्रत्येक देशाने विचार करायला हवा. वारंवार शब्दच्छल करून भारताच्या विरोधात सातत्याने तोंडसुख घेणार्‍या विकिपीडियाच्या उधळलेल्या वारूला कोण नियंत्रणात आणणार ? हे भारत सरकारने वेळीच ठरवावे, अन्यथा सर्वत्र मिरवणारा हा ‘विश्वकोश’ भारताला कधी विनाशाच्या खाईत लोटेल, हे कुणाला कळणारही नाही.

‘ए.एन्.आय.’च्या संदर्भात उच्च न्यायालयाने ‘विकिपीडिया’ला नोटीस पाठवली; पण ही पहिलीच नोटीस नव्हे, तर याआधीही भारताचा शीख धर्मीय क्रिकेट खेळाडू अर्शदीप सिंह याला ‘खलिस्तानवादी’ म्हटल्याप्रकरणी भारत सरकारने ‘विकिपीडिया’ला नोटीस पाठवली होती. खेळाडूचा खलिस्तानवादाशी काडीमात्र संबंध नसतांनाही त्याच्यावर असा आरोप करणे, हा किती मोठा गुन्हा आहे ! ‘वडाची साल पिंपळाला जोडण्याचा प्रकार’च आजवर या संकेतस्थळाने भारताच्या संदर्भात केला आहे. ‘अशा खोटारड्या आणि स्वतःला हवे तसे वागणार्‍या संकेतस्थळाने ‘विश्वकोश’ या शब्दाला गालबोट लावलेले आहे’, असे म्हणता येईल.

भारतियांनो, वेळीच जागृत व्हा !

‘विकिपीडिया’ संकेतस्थळाचे नियंत्रण साम्यवादी विचारसरणीच्या लोकांकडे असल्याने त्यांच्याकडून वारंवार भारतद्वेष व्यक्त करण्याचे प्रकार होतांना आढळतात. ‘विकिपीडिया’ साम्यवादी आणि उदारमतवादी विचारसरणी जोपासणार्‍यांच्या हातात गेलेले आहे’, असा आरोप मध्यंतरी करत संकेतस्थळाचे सहसंस्थापक लॅरी सँगर यांनी त्याला सोडचिठ्ठी दिली होती. आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर लक्षात येते की, साम्यवाद्यांची विचारसरणी नकारात्मक असल्याने त्यातून देशात अनेक हत्याकांडे झाली. त्यामुळे ही विचारसरणी राष्ट्रहितासाठी हानीकारक आहे. हा परिणाम जाणवल्याने अनेक देशांनी त्यांच्याकडील साम्यवाद संपुष्टात आणला; पण भारतात या विचारसरणीची पाळेमुळे देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेसच्या सत्ता काळात अगदी खोलवर रुजलेली आहेत. साम्यवाद्यांना धर्मनिरपेक्षतावादी आणि तथाकथित मानवतावादी यांची फूस मिळाली की, ते मोठी मजल मारू शकतात. भारतानेही या साम्यवादाचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे. भारताकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धाडसच होऊ नये, अशी पत भारताने निर्माण करावी. ‘िवकिपीडिया’ असो वा कुणीही, त्यांच्या माध्यमातून होणारी देशाची दुर्दशा रोखण्यासाठी हिंदूंनी राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करणे अपरिहार्य आहे. तसे झाल्यासच भारताचे अस्तित्व अबाधित राहील !