|
त्रिशूर (केरळ) – येथील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाने भाविकांना तुळशीचा प्रसाद न देण्यास सांगितले आहे. भाविकांनी आणलेली तुळस पूजेत उपयोगी नाही आणि त्यात रसायनांचे प्रमाणही अधिक असते, त्यामुळे ती वाहू नये, असे मंडळाने म्हटले आहे. मंदिराच्या मंडळाने भाविकांना तुळशीऐवजी कमळाची फुले घेऊन मंदिरात येण्याचा सल्ला दिला आहे. मंदिर मंडळाच्या या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. मंडळ आपल्या हक्कावर अतिक्रमण करत असल्याबद्दल भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मंडळाचे प्रमुख माकपचे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे) नेते व्ही.के. विजयन् आहेत.
१. मंदिर मंडळाने अलीकडेच भाविकांना बाहेरून तुळशी खरेदी करून मंदिरात आणण्याचा सल्ला दिला आहे. भक्त ही तुळशी भगवान गुरुवायूर (भगवान विष्णूचे रूप) यांना वाहत असत. पिढ्यान् पिढ्या गुरुवायूर मंदिरात पूजेची फुले किंवा हार आणण्याचे काम काही कुटुंबे करत असल्याचे सांगितले जाते.
२. ‘बाहेरून आणलेल्या तुळशीचा वापर हार घालण्यासाठी किंवा देवपूजेसाठी केला जात नाही. ही तुळस एका खासगी संस्थेला दिली जाते, जी नंतर त्यातून इतर अनेक उत्पादने निर्माण करते. बाहेरून आणलेल्या तुळशीत कीटकनाशकाचे प्रमाण अधिक असल्याने भाविकांनी ती आणणे टाळावे, असे मंडळाने म्हटले आहे.
३. मंदिरातील काही कर्मचार्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, बाहेरून आणलेल्या तुळशीमुळे त्यांच्या हाताला खाज येते आणि त्यामुळे अॅलर्जीही होते.
४. क्षेत्र रक्षा समितीचे सचिव एम्. बिजेश म्हणाले की, जर मंडळ वाहने आणि सोन्याचे दागिने यांसारख्या वस्तू स्वीकारू शकतील, ज्या पूजेसाठी वापरल्या जाऊ शकत नाहीत, तर त्यांनी भक्तांना काही प्रिय वस्तू देवाला अर्पण करण्यापासून रोखू नये. तुळशी वाहण्यास नकार देण्याऐवजी त्याचा काही चांगला उपयोग का शोधू नये ?
५. यापूर्वी मे २०२४ मध्ये केरळच्या मंदिरांमध्ये अरळीच्या फुलावरही बंदी घालण्यात आली होती. या फुलामुळे २४ वर्षीय परिचारिकेचा मृत्यू झाला होता. यानंतर २ मोठ्या मंदिर मंडळांनी मंदिरांमध्ये हे फूल आणण्यावर बंदी घातली होती.
६. गुरुवायूर मंदिर १४ व्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिरात भगवान विष्णूची ४ हात असलेली मूर्ती स्थापित आहे. या रूपाला ‘गुरुवायूर’ म्हणतात.
संपादकीय भूमिका
|