‘२२.५.२०२२ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवाच्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी साधक दुतर्फा उभे होते. तेव्हा मीही तेथे उभी होते. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन घेण्यासाठी अवघी सृष्टी आतुर झाली आहे’, असे जाणवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ३ गुरूंचे रथातून आगमन झाले. तेव्हा ‘वातावरणात सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित झाले. दगड, माती, वृक्ष, वेली, पशू-पक्षी आणि चराचरातील प्रत्येक जीव त्यांच्या दर्शनासाठी आतुर झाला आहे. काळही काही क्षण त्यांच्या दर्शनासाठी थांबला आहे’, असे मला जाणवले.
२. आश्रमाच्या प्रवेशद्वारातून रथ बाहेर पडतांना ‘देवताही पृथ्वीवर अवतरल्या आहेत आणि पृथ्वीवरील भक्तांची दुःखे दूर करण्यासाठी प्रत्यक्ष विष्णूचे आगमन झाले आहे’, असे मला वाटले.
३. गुरुमाऊलींना श्रीविष्णूच्या रूपात पाहून साधकांना धन्य धन्य वाटणे
गुरुमाऊलींना श्रीविष्णूच्या रूपात पाहून साधकांना धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. आम्ही सर्व साधक प्रीती, कृतज्ञता, भाव आणि आनंद यांची अनुभूती एकाच वेळी घेत होतो.
४. साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मोहक रूप आणि हास्य पहाण्यात मग्न होणे अन् साधकांची भावजागृती होणे
सर्व साधक देहभान हरपून गुरुमाऊलींचे दर्शन घेत होते. सूत्रसंचालकाच्या बोलण्याविना कुठलाही आवाज येत नव्हता. निसर्गही परात्पर गुरु डॉक्टरांचे मोहक रूप आणि हास्य बघण्यात मग्न झाला होता. गुरूंचे दर्शन झाल्याने सर्व साधकांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. सर्व साधक त्यांचे मनमोहक रूप डोळ्यांमध्ये साठवून घेत होते.
५. गुरुमाऊलींच्या डोळ्यांतूनही साधकांप्रतीची प्रीती ओसंडत होती. प्राणापेक्षाही प्रिय अशा साधकांकडे पाहून सनातनच्या तिन्ही गुरूंचा भाव जागृत होत होता.
त्या वेळी ‘गुरुमाऊलींना सर्व जिवांची किती काळजी आहे !’ या विचाराने माझे मन भरून आले आणि माझी गुरुमाऊलींच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’
– सौ. वैशाली कोथमिरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |