पोलिसांकडून गुन्हा नोंद !
बेळगाव – महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी काळ्या दिनाच्या निमित्ताने भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या सायकल फेरीला पोलीस प्रशासनाने अनुमती नाकारली होती; तरीही दडपशाही झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने बेळगाव शहरात सायकल निषेध फेरी काढण्यात आली. यामुळे विनाअनुमती काढलेल्या फेरीसाठी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तत्कालीन केंद्र सरकारने १ नोव्हेंबर १९५६ या दिवशी झालेल्या भाषावार प्रांत रचनेच्या वेळी बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ सीमावासीय बांधव १ नोव्हेंबर हा ‘काळा दिन’ म्हणून पाळतात. १ नोव्हेंबरलाही हा दिवस पाळण्यात आला. यात ‘बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली धर्मवीर संभाजी उद्यानातून चालू झालेल्या निषेध फेरीमध्ये भाषावार प्रांतरचनेच्या वेळी केंद्र सरकारने केलेल्या अन्याय कृतीच्या निषेधार्थ काळ्या रंगाचे कपडे, काळे आणि भगवे ध्वज, काळ्या टोप्या, डोक्याला काळी वस्त्रे बांधून मराठी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने सीमा बांधवांवर सातत्याने अन्याय केला आहे, तसेच कर्नाटक सरकार सायकल फेरीला अनुमती नाकारून दडपशाही करीत आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. येणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी सीमाप्रश्नाच्या सूत्रांचा समावेश घोषणापत्रात करावा, अशी मागणी सीमा बांधवांनी केलेली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.’’ या प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण-पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांसह अन्य उपस्थित होते.