पृथ्वीपेक्षा दुप्पट पाणी असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा
१४ ऑक्टोबर २०२४ या दिवशी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने एका महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी ‘युरोपा क्लिपर’ हे अंतराळयान पाठवले आहे. हे यान युरोपाजवळ एप्रिल २०३० पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. गुरु ग्रहाच्या उपग्रहापैकी एक उपग्रह म्हणजे युरोपा ! या युरोपावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर संभाव्य जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी या मोहिमेतून प्रयत्न करण्यात येणार आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शास्त्रज्ञांना या युरोपावर घनीभूत झालेले, म्हणजे बर्फ असलेले पाणी असल्याचे लक्षात आले आहे. हे पाणी थोडेथोडके नसून पृथ्वीवरील सर्व महासागरांतील पाण्यापेक्षा दुप्पट असल्याचे लक्षात आले आहे. युरोपा ग्रहावरील वातावरणाच्या स्थितीमुळे पाणी बर्फस्वरूपात असल्यामुळे त्या खाली जीवसृष्टी आहे कि कसे ? याचा शोध घ्यायचा आहे. ही नासाची अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेमुळे पराग्रहावरील जीवसृष्टीविषयी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.
१. ‘नासा’चे महासागराच्या तळाशी संशोधन
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ तिच्या काही वैज्ञानिकांना समुद्राखाली संशोधन करण्यासाठीच्या मोहिमेवर पाठवले आहे. याला ‘निमो’ मोहीम म्हणतात. नासाचे वैज्ञानिक, अभियंते आणि अंतराळवीर यांना अतिशय प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीतील संशोधनाच्या दृष्टीने काही आठवडे समुद्राच्या पाण्याखाली पाठवले जाते. नासाने समुद्राखाली एक प्रयोगशाळा उभारली आहे. तिला ‘ॲक्वेरिअस’, असे म्हणतात. या ठिकाणी काही आठवड्यांसाठी राहून नासाचे वैज्ञानिक संशोधन करत आहेत. ‘नासाचे वैज्ञानिक अंतराळाऐवजी समुद्राखाली कसले संशोधन करतात ?’, असा प्रश्न पडू शकतो.
नासाच्या या समुद्राखालील संशोधनाचे उद्दिष्ट वेगळे आहे. वैज्ञानिक पद्धतीने पृथ्वीच्या उत्पत्तीचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातील एक भाग म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टी ! पृथ्वीवर सजिवांची उत्पत्ती कशी झाली ? याविषयी संशोधन चालू आहे. त्यामध्ये पृथ्वीवरील एक पेशीय अमिबासारख्या जीवजंतूपासून अनेक पेशी असलेल्या मानवाचेही संशोधन अंतर्भूत आहे. ही जीव निर्मितीची प्रक्रिया पृथ्वीच्या पृष्ठभागावर होत असते. त्यासाठी ऊर्जेचा स्रोत सूर्य असतो. तीच निर्मितीची प्रक्रिया पृथ्वीच्या केंद्रभागाकडेही होत आहे, तेथे तापमान अतिशय अधिक आहे. लाव्हारस पृथ्वीच्या अंतर्गत भागात आहे आणि ज्वालामुखीच्या स्वरूपात त्याचा उद्रेक झाल्याचे काही चलचित्रांद्वारे पाहिले आहे.
२. पाण्याखाली जीवनिर्मितीची प्रक्रिया
हीच जीवनिर्मितीची प्रक्रिया पाण्यातही होते. ‘पाण्याच्या पृष्ठभागापासून ते पाण्यात काही अंतरापर्यंत सूर्यकिरण पोचतात. त्यामुळे सूर्याच्या ऊर्जेवर तेथील जीवसृष्टीची उत्पत्ती होत आहे’, असे वैज्ञानिक मानतात. समुद्रात प्रत्येक काही अंतरावर जीवसृष्टी वेगवेगळी आहे, म्हणजे तेथील मासे, जलचर प्राणी वेगवेगळे आहेत. सध्या पृथ्वीवरील महासागरांमध्ये एक सर्वांत खोल जागा आहे आणि ती १० किलोमीटरहून अधिक खोल आहे. त्या ठिकाणी जीवनिर्मिती कशी होत आहे ? याचे शास्त्रज्ञांना कुतूहल आहे. त्यामुळे जीवसृष्टीच्या निर्मितीची काही रहस्ये उलगडू शकतात का ? याची त्यांना जिज्ञासा आहे. पॅसिफिक महासागरात एक अशी सर्वांत खोल जागा असलेले ठिकाण आहे, जेथे समुद्राचा तळ सर्वांत खोल आहे. ज्याप्रमाणे उंच पर्वत वरवर गेल्यावर निमूळता होत जातो, त्याप्रमाणे ही जागा जसे खाली जाऊ तशी निमूळती होत जाते. त्या जागेला ‘मारिआना ट्रेंच’, असे म्हणतात. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १० सहस्र ९३५ मीटर एवढे खोल आहे, म्हणजे जगातील उंच एव्हरेस्ट शिखर जर समुद्रात उलटे केले, तर त्याचे निमूळते टोक समुद्रात जेथपर्यंत पोचेल, त्याच्याही खाली दीड ते २ किलोमीटर खोलवर ही जागा आहे. ही जागा अनुमाने दीड किलोमीटर लांब आहे. या ठिकाणीही नासाचे संशोधन होत आहे. एवढ्या खोल जागेत जाणेच अतिशय जोखमीचे असते; कारण समुद्रात जसे खाली जाऊ तसे पाण्याचा दाब काही सहस्र एककने वाढत जातो. काही मासांपूर्वी टायटॅनिक बोटीचे अवशेष पहाण्यास जाणारी एक प्रवासी पाणबुडी समुद्रात खाली ३ किलोमीटर अंतरावर समुद्रातील पाण्याच्या दाबाने पूर्णपणे नष्ट झाली, म्हणजे एवढ्या प्रचंड दाबाने त्यातील व्यक्तींची वाफ झाली, असेच म्हणावे लागेल. एवढी ती दुर्घटना भीषण होती. समुद्राखाली ३ किलोमीटर एवढा दाब, तर ११ किलोमीटर अंतरावर केवढा असेल, याची कल्पना करता येत नाही. या ठिकाणी नासाचे शास्त्रज्ञ जोखीम पत्करून संशोधन करत आहेत. या ठिकाणी परिस्थितीचा विचार करता येथे तापमानही उष्ण, भूमीत बाहेर पडत असलेल्या लाव्हारसामुळे आणि तो नंतर थंड झाल्यामुळे वेगळ्याच प्रकारची भूरचना आहे, वेगळ्या वनस्पती आणि येथे काही जलचरही शास्त्रज्ञांना आढळले की, ते एवढ्या दाबाखालीही सहजतेने वावरत आहेत. येथे सूर्यप्रकाशाऐवजी भूगर्भातील तीव्र उष्णता हा ऊर्जेचा स्रोत आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे जीवजंतूंची उत्पत्ती सूर्यप्रकाशाविना होत आहे, तशी परिस्थिती ब्रह्मांडातील अन्य ग्रह, उपग्रह या ठिकाणी असू शकते आणि त्यातून पृथ्वीच्या उत्त्पत्तीविषयी काही माहिती मिळू शकते का ?, अन्य कुठल्या ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते का ? याचा शोध घेणे; परग्रहवासीय, म्हणजे वैज्ञानिकांच्या भाषेत ‘एलियन’ यांच्या सध्याच्या अस्तित्वाचे किंवा त्यांच्या पूर्वीच्या अस्तित्वाचे पुरावे शोधणे असा व्यापक विचार या संशोधनामागे आहे. त्यामुळे ही मोहीम वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय आव्हानात्मक आहे.
३. ‘युरोपा’विषयीची मोहीम
आता पुन्हा ‘युरोपा’ मोहिमेविषयी पाहू ! पृथ्वीचा जसा चंद्र हा उपग्रह, तसा गुरु ग्रहाचा उपग्रह ‘युरोपा’ हा आहे. गुरु ग्रहाचे एकूण ९५ उपग्रह आहेत, त्यातील हा चौथा मोठा उपग्रह आहे. युरोपावरील संशोधनच का निवडले ? तर या ग्रहावरील परिस्थिती आणि पृथ्वीवरील परिस्थिती यांमध्ये थोडेबहुत साम्य आहे. ‘सॅटेलाईट’च्या छायाचित्रांमध्ये सध्या युरोपा उपग्रहाचा पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे, असे दिसले आहे. काही छायाचित्रांमध्ये संपूर्ण ग्रहाभोवती हे बर्फाचे थर दिसतात. वैज्ञानिकांच्या मते बर्फाचे थर केवळ वरच्या भागात दिसत असले, तरी खालील बाजूला पाणी असू शकते. हे पाणी सध्या गोठलेल्या स्वरूपात आहे. या पाण्याचे आकारमान वैज्ञानिकांच्या दृष्टीने पृथ्वीवरील महासागरांमधील एकूण पाण्याच्या दुप्पट आहे. आपण काही कथांमध्ये आणि श्रीविष्णूच्या अवतारांपैकी वराह अवताराविषयी वाचले आहे. त्यामध्ये एका राक्षसाने पृथ्वीचे अपहरण केले, म्हणजे पृथ्वी पळवून नेली आणि तिला एका खोल समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवले, असा उल्लेख वाचला आहे.
पृथ्वीवरच महासागर असतांना पृथ्वी सागरात लपवून ठेवली, हा उल्लेख तार्किकदृष्ट्या वाचण्यास चुकीचा वाटू शकतो; मात्र आता असा ग्रह सापडला आहे, त्यावर पाणीच पृथ्वीच्या दुप्पट असल्याने या कथेची सत्यता वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित होऊ शकते. ब्रह्मांडात अशा कितीतरी गोष्टी, ग्रह, तारे आहेत, जे मानवाला अद्याप अज्ञात आहेत, त्यांच्यापर्यंत मानवाला पोचता आलेले नाही.
‘युरोपा क्लिपर’ हे यान युरोपापर्यंत पोचणे तेवढे सोपे नाही. चंद्रयान पृथ्वीवरून चंद्रापर्यंत जाण्यास जेवढे अंतर आहे, त्याहून युरोपाचे अंतर १ सहस्र ६०० पटींहून अधिक आहे, म्हणजे चंद्रावर जाणे म्हणजे शेजारच्या गावात जाणे धरले, तर युरोपावर जाणे हे मुंबईतून देहलीला जाणे धरावे लागेल. एवढ्या अंतरापर्यंत जाणे हे सरळही नाही. त्यामध्ये अनेक ग्रह, उपग्रह, स्वत: सूर्य आणि त्यांचे कार्यरत असलेले गुरुत्वाकर्षण यांना चुकवत युरोपा यानाला पुढे जावे लागेल. त्यामध्ये २ ग्रह, म्हणजे मंगळ आणि नंतर पृथ्वी यांना मोठा फेरा मारून, म्हणजेच त्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोग करून निर्माण झालेल्या वेगाने युरोपापर्यंत जावे लागेल. सध्याचे ‘युरोपा क्लिपर’ यान हे युरोपाच्या पुष्कळ जवळून फिरत जाऊन, म्हणजे तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. तेथील बर्फाचे परीक्षण, खनिजे, मातीची स्थिती, वातावरण यांचा अभ्यास करणार आहे. याच्या पुढील भागात युरोपावर प्रत्यक्ष यान उतरवून त्याच्या बर्फाच्या पृष्ठभागावर चक्क मोठे ‘ड्रिलिंग’ (खोदकाम) करणार आहे. हे काम काही वर्षे चालेल. यासाठी आण्विक ऊर्जेची व्यवस्था करण्यात येईल. हे ड्रिलींग करून या बर्फाच्छादित समुद्राच्या तळाशी, म्हणजे अनुमाने २० किलोमीटर अंतरापर्यंत हे ड्रिलींग करण्यात येईल आणि तेथे ४० हून अधिक पाणबुड्यांप्रमाणे छोटे यंत्रमानव तळाशी सोडून तेथील जलचरसृष्टी, पाणी, जीवाची उत्पत्ती यांचा अभ्यास करण्यात येईल. यातून शास्त्रज्ञांना अनेक प्रकारची माहिती मिळू शकणार आहे. यामध्ये या उपग्रहावर पूर्वी जीवसृष्टी होती का ? पाणी का गोठले ? सध्या जीवसृष्टी अन्य स्वरूपात आहे का ? वगैरे अनेक गोष्टी शोधता येतील. मुख्य म्हणजे परग्रहावरील सृष्टीचे पुरावे सापडण्यासाठी या अंतराळ मोहिमेचा लाभ होईल, असे मानले जाते. त्यामुळे शास्त्रज्ञ पूर्ण झोकून देऊन ही मोहीम पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रीत करत आहेत.
४. हिंदु धर्मशास्त्राचा बोध !
हिंदु धर्मग्रंथांमध्ये ‘सृष्टीची उत्पत्ती ईश्वराच्या संकल्पाने झाली’, असे नमूद केले आहे, म्हणजे डार्विनने सांगितल्याप्रमाणे मानवाची उत्क्रांती झालेली नाही, तर ती दैवी नियोजनानुसार एकाच वेळी देवाने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले आहे. या ब्रह्मांडातील सजीव-निर्जीव सृष्टी ज्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, मनुष्य, पर्वत, नद्या, महासागर ही सर्व देवाची उत्पत्ती आहे. त्याचप्रमाणे अनेक ग्रह, तारे, आकाशगंगांसारख्या अनेक आकाशगंगा, ते सामावणारे ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांडे अशी सर्वच रचना भगवंताच्या संकल्पातून झाली आहे. ही सर्व निर्मिती देव करतो, त्याप्रमाणे काही लाखो वर्षांनी त्यांचा लय करून पुन्हा नवीन निर्मिती करतो. एवढ्या लाखो ग्रह-तारे असणार्या ब्रह्मांडात त्यामुळे केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी असेल, अन्य ठिकाणी नसेल, असे तार्किकदृष्ट्याही पटणारे नाही. एवढेच की, भगवंताने निर्माण केलेला हा सर्व विश्वमय संसार समजून घेण्यास, जाणून घेण्यास मानवी बुद्धीच्या प्रचंड मर्यादा लक्षात येतात. शास्त्रज्ञांना एक शोध लावण्यासाठी अनेक वर्षे कष्ट घ्यावे लागतात. काही वेळा एका पूर्ण पिढीला कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा कुठे एखादा शोध लागतो. मानवी बुद्धीच्या प्रयत्नांनी विश्वाच्या उत्पत्तीचे कोडे सोडवणे एवढे सोपे आहे का ? या विश्वाच्या अफाट पसार्यातून काही शोधण्यासाठी शास्त्रज्ञांची धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे; मात्र देवाच्या या कोड्याची चावीच जर देवाला शरण जाऊन, त्याची भक्ती करून मिळवता आली, तर हे कोडे चटकन सुटेल. त्यामुळे स्थूल प्रयत्नांच्या जोडीला ईश्वराला प्राप्त करण्याचे प्रयत्न केल्यास ईश्वराच्या आशीर्वादामुळे अनेक गूढ वाटणार्या गोष्टींची उकल मानवाला लवकर आणि सहज होऊ शकते. त्यामुळे जग निर्माण करणार्या देवाचाच शोध घेणे, हे प्राधान्य ठेवल्यास जीवनाची इतिकर्तव्यपूर्ती होईल यात शंकाच नाही, हाच बोध आहे.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (२२.१०.२०२४)