China BRI Project N Brazil : आता ब्राझिलचाही चीनच्या अतीमहत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी न होण्याचा निर्णय !

याआधी भारत, फिलिपाइन्स, इटली आदी देशांनीही केला होता विरोध !

ब्राझिलचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विशेष सल्लागार सेल्सो अमोरिम व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

ब्राझिलिया (ब्राझिल) – आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘बी.आर्.आय.’, म्हणजेच ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’मध्ये सहभागी होण्यास नकार देत ब्राझिलने चीनला मोठा धक्का दिला आहे. यामुळे ‘ब्रिक्स’ या सदस्य देशांच्या संघटनेतील भारतानंतर ब्राझिल हा या प्रकल्पाला विरोध करणारा दुसरा देश ठरला आहे. ब्राझिलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विशेष सल्लागार सेल्सो अमोरिम यांनी सांगितले की, ब्राझिल चीनच्या ‘बी.आर्.आय.’ प्रकल्पात सहभागी होणार नाही, त्याऐवजी चिनी गुंतवणूकदारांना सहकार्य करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधेल.

१. सेल्सो अमोरिम पुढे म्हणाले की, ब्राझिलला चीनसमवेतचे स्वतःचे संबंध नवीन पातळीवर न्यायचे आहे; परंतु यासाठी आम्ही कोणत्याही करारावर स्वाक्षरी करणार नाही.

२. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे २० नोव्हेंबरला ब्राझिलला अधिकृत भेट देणार आहेत. त्यांच्या या भेटीला ब्राझिलकडून आलेला हा निर्णय मोठा धक्का समजला जात आहे.

३. ब्राझिलने या प्रकल्पात सहभागी होऊ नये, यासाठी ब्राझिलमधीलच अनेक अर्थतज्ञ, तसेच परराष्ट्र व्यवहार अधिकार्‍यांनी विरोध केला होता. या पायाभूत सुविधा प्रकल्पात चीनच्या सहभागामुळे ब्राझिलला अल्पावधीत कोणताच लाभ होणार नाही, तसेच त्यामुळे ब्राझिलचे अमेरिकेसमवेतचे संबंध बिघडू शकतात, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

४. ब्राझिलपूर्वी फिलिपाइन्स आणि इटली यांनीही प्रकल्पाचा भाग होण्यास नकार दिला होता. सध्या केवळ पाकिस्तान, तसेच आफ्रिकेतील छोटे देश या प्रकल्पाचा भाग आहेत.

५. ‘बी.आर्.आय.’च्या प्रकल्पांतर्गत चीन ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सी.पी.ई.सी.) बांधत आहे. हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जात असून हा प्रकल्प म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याने त्यास भारताचा आधीपासूनच प्रखर विरोध आहे.

संपादकीय भूमिका

चिनी ड्रॅगनची स्वार्थांध वृत्ती आता लपून राहिलेली नाही. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या उदाहरणांतून जग अधिकच सतर्क झाले आहे. त्यात अमेरिकेशी संबंध बिघडवायचीही कुणाला इच्छा नाही. याचा लाभ ‘विन-विन अ‍ॅटिट्यूड’ असणार्‍या भारताला मात्र होत आहे, हे खरे !

(विन-विन अ‍ॅटिट्यूड म्हणजे व्यापार करणार्‍या दोघा देशांचे समान हित जोपासण्याचा दृष्टीकोन)