|
नवी देहली : केंद्रशासनाच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘एक्स’ आणि ‘मेटा’ ही आघाडीची सामाजिक माध्यम आस्थापने, तसेच विमान आस्थापने यांची २३ ऑक्टोबरला ऑनलाईन बैठक घेतली. गेल्या काही आठवड्यांत विमाने बाँबने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या सूत्रावर आयोजित बैठकीत सरकारने विचारले की, तुम्ही या धोकादायक अफवा रोखण्यासाठी काय केले ? खरेतर तुम्ही गुन्ह्याला प्रोत्साहन देत आहात, असा परिस्थितीजन्य पुरावा आहे, असा आरोपही मंत्रालयाने केला.
१. गेल्या ९ दिवसांत १७० हून अधिक विमाने बाँबने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने विमान वाहतूक क्षेत्राला तब्बल ६०० कोटी रुपयांचा तोटा झाला.
२. केवळ २२ ऑक्टोबर या एकाच दिवशी ५० हून अधिक विमानांना बाँबच्या धमक्या मिळाल्या. यांमध्ये एअर इंडिया, इंडिगो, आकासा एअर, विस्तारा आदी आस्थापनांच्या विमानांचा समावेश आहे.
३. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी नुकतेच म्हटले की, धमक्या देणार्यांची नावे ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. यासह ‘विमान वाहतूक सुरक्षा नियम आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षेच्या विरोधात अवैध कृत्यांचे दमन अधिनियम १९८२’मध्ये सुधारणा करण्याची योजना आखली जात आहे.
४. नुकतेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे प्रमुख विक्रम देव दत्त यांना पदावरून हटवत कोळसा मंत्रालयात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा पालट बाँबच्या धमक्यांशी जोडला जात आहे.