|
कोल्हापूर – जिल्ह्यात जुलैमध्ये झालेली अतीवृष्टी आणि पुर यांमुळे जिल्ह्यातील ४७ सहस्र ८९१ हेक्टर क्षेत्रांतील पिकांची हानी झाली आहे. याचा १ लाख ६२ सहस्र ८०० शेतकर्यांना फटका बसला आहे. शासनाने घोषित केलेल्या हानीभरपाईचे १२२ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले आहेत. तहसीलदारांच्या माध्यमातून आतापर्यंत २५ कोटी रुपयांचा निधी हानीग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. उर्वरित रकमेचे तात्काळ वाटप केले जात आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
जुलै मध्ये कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा या ४ नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदी अन् ओढ्याच्या काठासह अनुमाने १२ सहस्र हेक्टरवरील शेती पिकांची हानी झाली आहे.
जिल्ह्यात पुरामुळे सर्वाधिक हानी शिरोळ तालुक्यात झाली असून ७ सहस्र ५०० हेक्टरवरील जिरायती पिकांची हानी झाली आहे. ४० सहस्र ३०० हेक्टर बागायती पिकांची आणि ३७ हेक्टरवरील फळबागा पिकांची हानी झाली आहे. शिरोळ तालुक्यात १० सहस्र हेक्टर आणि हातकणंगले तालुक्यांत ९ सहस्र ५०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. करवीर तालुक्यात ७ सहस्र ६८७, कागल २ सहस्र ४५३, राधानगरी १ सहस्र ४७८, गगनबावडा १ सहस्र २९७, पन्हाळा ५ सहस्र ९२४, शाहूवाडी ४ सहस्र ६७३, गडहिंग्लज ८०७, आजरा ३६१, चंदगड २ सहस्र ३०९, भुदरगड १ सहस्र ९३ हेक्टर क्षेत्राची हानी झाली आहे.