जीवनोद्धार करणारे भारतीय शिक्षण !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु संस्कृती आणि इस्लामी राजवट’ याविषयी वाचले. आज पुढचा भाग येथे देत आहोत.                   

(भाग ५४)

पू. प्रा. सु.ग. शेवडे

प्रकरण १०

१. भारतातील प्राचीन शिक्षणपद्धत

‘भारतातील प्राचीन शिक्षणपद्धत आश्रमीय (आश्रमस्वरूपाची) होती. तेथे ३ वर्णांच्या लोकांना धार्मिक, गणितादी विद्यांचे शिक्षण दिले जाई. क्षत्रिय आणि वैश्य यांना अल्पकाळ आश्रमात रहावे लागे. ब्राह्मणांची मुले मौजीबंधनानंतर १२ वर्षे आश्रमात रहात. वेद, शास्त्र, पुराणे, उपनिषदादी ब्राह्मविद्यांचा अभ्यास करत. क्षत्रियांना आश्रमात गुरूंकडून शस्त्रास्त्रविद्या मिळत असे.

अन्य कुणालाही आश्रमात राहून शिक्षण घेण्याची आवश्यकता नव्हती. सर्वांना त्यांच्या घरीच शिक्षण मिळत असे. ग्रामीण जीवनव्यवस्थेत अठरापगड जाती होत्या. तेली, तांबोळी, न्हावी, सुतार, सोनार, लोहार, साळी, माळी आणि कोष्टी इत्यादी सर्वांना स्वजातीच्या व्यवसायाचे शिक्षण घरीच मिळे. प्रथम शिक्षण, नंतर वडिलांसमवेतच प्रात्यक्षिक अन् नंतर प्रत्यक्ष व्यवसाय ! १२ – १३ व्या वर्षांपासून मुले वडिलांना व्यवसायात साहाय्य करत; पण आता काळ पालटला आहे.

२. दायित्वाच्या जाणिवेमुळे पूर्वीच्या काळी निर्माण झालेली मानसिकता

ज्या वयात मुलांनी व्यवसायात पडावे, द्रव्यार्जन करावे, आपल्या वडिलांना घर चालवण्यास साहाय्य करावे, त्या वयात आमची मुले महाविद्यालयात २ – २ वर्षे काढत, टवाळखोरी करत, ‘आती क्या खंडाला’ या हिंदी गाण्याचे धडे गिरवत आहेत. राष्ट्राचे दायित्व घेणारे नागरिक घडवण्याची कोणतीही योजना आज आपल्याजवळ नाही.

उपरोक्त शिक्षणपद्धतीमुळे भाराभर विषयांचा अभ्यास करावा लागत नव्हता. दप्तरांची ओझी घेऊन शाळेत जावे लागत नव्हते. आताप्रमाणे महाविद्यालयाचे सहस्रो रुपयांचे शुल्क भरावे लागत नव्हते. व्यसनादी स्वैराचारांना जीवनात वाव नव्हता. प्रत्येकाला दायित्वाची जाणीव होती. धंद्यात तेजी होती. पोटाचा व्यवसाय जन्मसिद्ध होता. आर्थिक प्राप्तीसाठी दुसर्‍यांच्या धंद्यावर आक्रमण करायची प्रवृत्ती नव्हती. नोकरी-धंद्यात समाधान होते. कामाला प्रतिष्ठा होती. कुणाचाच व्यवसाय हीन समजला जात नव्हता. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।’ (तुकाराम गाथा, अभंग २८६७, ओवी २), म्हणजे ‘भगवंताने आपणाला ज्या स्थितीत ठेवले, त्या स्थितीत रहावे. चित्ती मात्र समाधान असावे’, अशी शिकवण होती.

३. संतांची अनमोल शिकवण

‘देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।।’, म्हणजे संत नरहरि सोनार महाराज म्हणतात, ‘हे देवा, मी तुझा सोनार असून नामरूपी सुवर्णाचा व्यवहार करतो’, ही प्रवृत्ती होती. ‘आमुची माळीयाची जात । शेत लावूं बागाईत ।।’, म्हणजे संत सावता माळी महाराज म्हणतात, ‘मी जातीने माळी आहे. शेती करणे, हा माझा व्यवसाय आहे’, हा विचार होता. ‘अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी ९११), म्हणजे ‘अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे, तेच त्याने करावे, असे ईश्वराचे मनोगत आहे’, असे ते मार्गदर्शन होते. याच शैक्षणिक जीवनातून गोरा कुंभार, राका कुंभार, सावता माळी, सेना न्हावी, चोखामेळा, रोहिदास चांभार उन्नत झाले !

४. नैतिकता आणि आदर असल्याने अत्याचार किंवा दुराचार यांना स्थान नसणे

‘आध्यात्मिकदृष्ट्या मोठे होणे’, हे जीवनाचे ध्येय होते. ‘तृप्तता’ हा जीवनाचा आधार होता. ‘श्रद्धा’ हा विचारांचा पाया होता. ‘ईश्वरनिष्ठा’ ही मनाची बैठक होती. ‘भूतदया’ हे भांडवल होते. ‘जो जें वांछील तो तें लाहो ।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९५), म्हणजे ‘प्राणिमात्रात जो जे इच्छील, ते त्याला प्राप्त व्हावे’, ही प्रार्थना होती. ‘मातृदेवो भव । पितृदेवो भव । आचार्यदेवो भव ।’ (तैत्तिरीयोपनिषद्, शिक्षा, अनुवाक ११, वाक्य २), म्हणजे ‘आई, वडील आणि आचार्य यांना देवता मानणारा हो.’ या धर्माज्ञा होत्या. ‘पराविया नारी रखुमाईसमान ।’, म्हणजे ‘संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘परस्त्री ही रखुमाईसमान मानणे काही वाईट आहे का ?’ ही नैतिकता होती. स्वकष्टार्जित ऐश्वर्याची लालसा होती. अत्याचार आणि दुराचार अशा प्रवृत्ती नव्हत्या.

(क्रमशः)

– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सु.ग. शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)